नांदेड| कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचं ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला असावं. विशेषतः महिलांच्या प्रगतीसाठी कायद्याचा मोठा हातभार लागला आहे. कायदाच मोठी सामाजिक सुधारणा घडवून आणतो, असे मत ॲड. दीपा बियाणी यांनी आज व्यक्त केले.
नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत महिला दिनाच्या औचित्याने उत्सव स्त्री जाणिवांचा या कार्यक्रमातील तिची अनवट वाट या अंतर्गत मुक्त संवादात त्या बोलत होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कळम-कदम, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे व कंधारचे एकात्मिक बालविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी सर्वांशी मुक्त संवाद करताना त्यांनी त्यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक आणि पत्रकारितेचा प्रवास उलगडून दाखवला.
स्त्रीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर तिची अनेक ठिकाणी ससेहोलपट होते. परंतु कुणालाही हा प्रवास एकट्यानेच करणं आवश्यक असतं. म्हणून तिने स्वतः झटलं पाहिजे आणि सर्व आघाड्यावर तोंड दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. माणसाच्या चुकीच्या धारणा बदलण्यासाठी कायदा हाच आवश्यक असतो. कायद्यानेच सगळे बदलले जाते. भारतात पूर्वी सतीप्रथा, हुंडा प्रथा, विधवा पुनर्विवाहसाठी बंदी अशा अनेक प्रतिगामी गोष्टी होत्या. परंतु समाज सुधारकांचे प्रयत्न आणि प्रजासत्ताक लागू झाल्यानंतर कायद्याचे राज्य आले आणि त्यानंतर सर्वांना समान संधी मिळाली. स्त्रियांच्या बाबतीतील चुकीचे कायदे रद्द झाले.
आपण दुर्बल आहोत ही मानसिकता काढून टाका. मुलींनी, महिलांनी वाचावं. काही तरी दररोज वाचा. आपण जेव्हा विस्कळीत होतो आपलं जेव्हा मन लागत नाही तेव्हा आपण जर काही वाचन केलं तर त्यातून नक्कीच कुठला तरी मार्ग आपल्याला सापडतो. पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा त्यांना सहकार्य करावे. त्यांचे अभ्यास व्यवस्थापन करून घ्यावे म्हणजे मुलाचा प्रवास सुखकर होतो. ऑन द पाथ ऑफ मेरिट हे माझे पुस्तक एका यशाची कहाणी आहे. अरुण हातवळणे आणि सुनंदा हातवळणे यांनी पुण्यात केलेले प्रयोग यांना अनुसरून मी नांदेडमध्ये केले आणि माझ्या मुली आणि मुलासाठी सर्वांसाठीच फायदेशीर ठरले. इतर लोकांनाही घेऊन यामध्ये काम केलेलं आहे.
प्रजावणी मधील मानसी पुरवणीसाठी महिलांचा सहभाग, साहित्य, पुस्तक वाचन संस्कृती, सामाजिक कार्य आदी विषयांबाबत त्यांनी मुक्त संवाद साधला. या चर्चेत मुख्य संवादक सीमा देवरे ह्या होत्या. यात डॉ. अर्चना बजाज, अनिता दाणे, त्रिवेणी झाडे, राजश्री देशमुख आदींनी सहभाग घेतला. यावेळी उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, तंत्रस्नेही विशेष सहाय्यक संतोष केंद्रे, संजीव मानकरी आदींची उपस्थिती होती.