सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नांदेड| राज्यातील स्वयंसेवी संस्थांन मार्फत चालविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा आणि वसतीगृह अधीक्षक व गृहपाल यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून या बाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मचारी संलग्न वसतीगृह अधीक्षक व गृहपाल महासंघाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून सुधारित वेतनश्रेणीची मागणी केली होती. राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या विशेष शाळा,कर्मशाळा, वसतीगृह अधीक्षक व गृहपाल यांना मिळणारे वेतन शासकीय आदिवासी आश्रमशाळा व शासकीय वसतीगृह येथील वसतीगृह अधीक्षक व गृहपालांपेक्षा कमी असून काम मात्र अधिक आहे.
याबाबत असलेला भेदभाव दूर करुन वसतीगृह अधीक्षक व गृहपालांना शासकीय आश्रम शाळा व वसतीगृहाप्रमाणे मिळावी या मागणीसाठी संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्याला यश प्राप्त झाले असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे समाज कल्याण आयुक्तांनी सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शासन स्तरावर हा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी अपेक्षा राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे वसतीगृह अधीक्षक संजय शिंदे यांनी व्यक्त केली.