मतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्वाचा - केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय -NNL


औरंगाबाद|
मतदान प्रक्रिया सर्वंकषरित्या यशस्वी होण्यासाठी महिला, नवमतदार यांचा सहभाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांची परिपूर्ण नोंदणी करुन सर्व पात्र मतदारांचा मतदान प्रकियेतील सहभाग वाढवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनी आज येथे दिल्या.

औरंगाबाद येथील हॉटेल ताज विवांता मध्ये आयोजित मुख्य निवडणूक कार्यालयाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वीप (सिस्टमॅटिक व्होटर एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) मतदार जनजागृती कार्यक्रम तसेच मतदार यादी कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री.पांडेय यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाचे संचालक संतोष अजमेरा, उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती बोरकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपायुक्त जगदीश मिनियार, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवडणूक अधिकारी डॉ.भारत कदम यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांच्या सक्रीय सहभागातून यशस्वीरित्या पार पडणाऱ्या निवडणूका महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्या पार्श्वभूमीवर  राज्यात नव मतदार नोंदणी, मतदार यादी अद्यावतीकरण यासह स्वीप  उपक्रमातंर्गत मतदार जागृती कार्यक्रम उत्तमरित्या राबविल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री.पांडेय यांनी मतदान प्रकियेतील महिला तसेच नवमतदार असलेली युवापिढी यांचा सहभाग अधिक संख्येने वृध्दींगत करण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष भर द्यावा. आजही निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नाव असणे याला सर्वाधिक विश्वासार्ह पुरावा म्हणून जनमाणसात मान्यता आहे. 

ही बाब लक्षात घेऊन मतदार यादी अचूक, सशक्त आणि परिपूर्ण करण्याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. दिव्यांग, तृतीयपंथी, नव मतदारातील पात्र मतदारांची नोंद मतदार यादीत घ्यावी असे सूचित करुन राज्यात निवडणूक कार्यालयामार्फत येत्या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिये संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्त करुन इतर विद्यापीठानींही असा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतची आग्रही भूमिका श्री.पाण्डेय यांनी यावेळी मांडली. बीएलओ हा निवडणूक प्रक्रियेतील कणा आहे हे अधोरेखित करुन श्री.पांडेय यांनी शिर्डी आणि औरंगाबाद येथील बीएलओंसोबत संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

श्री.देशपांडे म्हणाले, राज्यात मतदार यादी बळकटीकरण कार्यक्रमातंर्गत खबरदारीपूर्वक काम सुरू असून ग्रामसभांमधून मतदार यादीचे वाचन करणे, प्रामुख्याने लग्न झालेल्या मुलींची नावे यादीत समाविष्ट करणे त्याचबरोबर लग्न होऊन मतदार संघाबाहेर गेलेल्या महिला मतदारांची नावे यादीतून वगळणे, स्थलांतरीत झालेले, मयत झालेले मतदार यांची नावे, दुबार नावे मतदार यादीतून वगळणे, यासोबतच दिनांक 01 जानेवारी, 2022 या तारखेला पात्र असलेल्या सर्व पात्र नव मतदारांच्या नावांची यादीत नोंद घेण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेबाबत बीएलओ प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून क्षेत्र स्तरावरील सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.  त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकातील मतदारांपर्यंत साध्या, सोप्या पध्दतीने मतदान प्रक्रिया, लोकशाहीचे महत्व, संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार, मतदार नाव नोंदणी यासह मतदान प्रक्रियेबाबतच्या जनप्रबोधनासाठी नाविन्यपूर्ण कल्पना  स्वीप कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येत आहे.

तसेच मतदान प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी उत्तम प्रचार साहित्याची निर्मित करण्यात येत असून त्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत 25 जानेवारी ते 31 मार्च, 2022 या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा अंतर्गत 'माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजूषा, व्हीडीओ मेकिंग स्पर्धा, गीत, गायन स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोषवाक्य या माध्यमातून नवनविन कल्पना आणि जनसहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी