नांदेड, अनिल मादसवार| कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील एका रुग्णास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान सहाय्यता निधीतून दोन लाख 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
मंजूर झालेल्या निधीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते आज देण्यात आले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील आणि नांदेड जिल्ह्यातील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना आर्थिक दृष्ट्या मदत मिळवून देण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.
पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून ही मदत मिळवून देण्यासाठी त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देत असतांनाच कॅन्सर किडनी व अन्य संबंधित अती जोखमीच्या आजारातील रुग्णांना बरे होण्यासाठी ही मदत मिळवून दिली जात आहे. बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील गंगाराम लचमन्ना कसल्लू यांच्यावर औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून ते कॅन्सर या आजाराशी लढा देत आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या खांगलेल्या गंगाराम लचमन्ना कसल्लू यांना मदतीची नितांत गरज होती.
त्यामुळे त्यांनी आर्थिक मदत मिळावी यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे विनंती केली होती. या अनुषंगाने खा.प्रतापराव चिखलीकर यांनी कॅन्सर ग्रस्त रुग्ण गंगाराम लचमन्ना कसल्लू यांना मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून ही मदत करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता कक्षातून तातडीने हालचाली झाल्या. प्रधानमंत्री कार्यालयाचे सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी 2 लाख 15 हजार रुपये मंजूर झाल्याचे प्राप्त झाले आहे. हे पत्र गंगाराम लचमन्ना कसल्लू यांचा मुलगा विठ्ठल गंगाराम कसल्लू यांना प्रवीण पाटील चिखलीकर व सौ.प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या आणि ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, अशा रुग्णांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळविण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष, वसंतनगर नांदेड या संपर्क कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.