नांदेड| रशिया व युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतिक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामूळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढी व गरजेनुसार आवश्यक खते खरेदी करुन ठेवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी.चिमणशट्टे यांनी केले आहे.
भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असून युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे. तरी सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध खत साठा असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांची खरेदी करुन आवश्यक खत साठा करुन ठेवावा. जेणेकरुन रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. पिकाच्या गरजेनुसार खताचा वापर करावा.
नांदेड जिल्ह्याचे सरासरी सोयाबिन पेरणी क्षेत्र 3 लाख 97 हजार 242 हेक्टर आहे. सिंगल सुपर फॉस्फेट हे कॅल्शियम, स्फुरद, गंधक घटक असणारे व कमी दरात उपलब्ध असणारे खत आहे. तरी शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या खताचा सोयाबिन पिकासाठी वापर करुन उत्पादन खर्चात बचत करावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.