जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना नगरविकास विभागाकडून शव वाहिका उपलब्ध करुन देणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे -NNL

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार


मुंबई|
नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. मोठ्या महानगरपालिकेमध्ये शव वाहिका उपलब्ध आहेत. नगरपालिकामध्ये शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी नगरविकास विभागाला विनंती करु, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले. याबाबत सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.

आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील पायरवाडीतील पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय बालकाला मोखाडा येथून जव्हार कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला. संबंधित मुलाचा मृतदेह दुचाकीवर स्वत:च्या घरी नेण्यात आला. ही गंभीर बाब आहे. वाहनचालक उशिरा आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिचारक व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणाबाबत अधिक खातरजमा करुन चौकशी केली जाईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी 200 खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम चालू असून यासाठी लागणारा निधी प्राधान्याने देण्यात येईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना कुठलाही मोबदला न घेता मोफत सोनोग्राफी केली जाईल. नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. आमदारांना आपल्या मतदारसंघात शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिकेत शव वाहिका असली पाहिजे. याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी अ आणि ब वर्गाची पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. क आणि ड पद भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. पी.जी. डॉक्टरांच्या ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग लवकरच समन्वयाने निर्णय घेईल.

जुन्या रुग्णवाहिकांना शववाहिकेत परिवर्तीत करण्याचे विचाराधीन आहे. तसेच पालघर जिल्ह्यासाठी किती शववाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या, आरोग्य विषयक प्रलंबित बाबी राहिल्या असल्यास या प्रक्रियेला जलदगती देण्यासाठी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. या लक्षवेधीमध्ये विलास पोतनीस, रविंद्र फाटक, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी