नांदेड, अनिल मादसवार| प्रभू रामचंद्रची वचनपूर्ती करण्यासाठी आज नांदेड शहरात दाखल होणार्या श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेचे आगमन होत आहे. या रथ यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्यासाठी नंदीग्राम नगरीतील सर्व राम भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रभू रामचंद्र हे चौदा वर्ष वनवासात होते. त्यावेळी ते ज्या मार्गाने गेले होते. त्या मार्गात त्यांना अनेकांनी मदत केली. परतीच्या प्रवासात त्या सर्वांना भेट देण्याचे वचन रामांनी दिले होते. परंतु वनवास संपण्यास फक्त एक दिवस आधी रावणाचा वध झाला. भरताने राज्यकारभार चालवताना अशी अट टाकली होती की, 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर प्रभू रामचंद्र परत आले नाही तर दुसर्या दिवशी प्राणत्याग करेल. भरताचे प्राण महत्त्वाचे असल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी श्रीलंका ते आयोध्या असा पुष्पक विमानातून प्रवास केला. वनवासातील मदत केलेल्या सर्वांना परत भेटण्याचे वचन प्रभू राम पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ज्या ज्या भागात प्रभू रामचंद्र गेले होते त्या त्या भागातून ही रथयात्रा जाऊन रामाचे वचन पूर्ण करणार आहे.
श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेचे 15 मार्च रोजी नांदेड येथे आगमन होणार असून यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्याची संपूर्ण तयारी झाल्यामुळे राम भक्तांनी दुपारी 1.00 वाजता शोभायात्रेत व सायंकाळी सहा वाजता कविसंमेलनात भगवे कपडे घालून हजारोच्या संख्येत उपस्थित राहून चरण पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन खा.चिखलीकर यांनी केले.
महाशिवरात्रीला श्रीलंकेतील अशोक वाटीका येथून ही यात्रा सुरू झाली आहे. 6500 किमी अंतर पूर्ण करून रामनवमीला अयोध्या येथे जाणार आहे. रथयात्रेमध्ये चरण पादुका असून त्या योगीजींच्या हस्ते अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. मंगळवार दिनांक 15 मार्चला दुपारी 1.00 वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून अतिभव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेमध्ये ढोल पथक, भजनी मंडळ, विविध देखावे, घोडे, अठरा फूट उंचीची राम मूर्ती, चरण पादुका रथ राहणार आहे.
शोभायात्रा दुपारी एक वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून प्रारंभ झाल्यानंतर जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ, मुथा चौक, शिवतीर्थ, गांधी पुतळा ,चिखलवाडी कॉर्नर, पंचवटी हनुमान मंदिर मार्गे मल्टीपर्पज हायस्कूल पर्यंत सायंकाळी 5.00 वाजता शोभायात्रेचा समारोप होणार आहे. मल्टीपर्पज हायस्कूलच्या भव्य मैदानावर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत देशातील नामवंत कवींचे वीर रस व हास्य रसाचे अखिल भारतीय कविसंमेलन होणार आहे. या कविसंमेलनात नांदेड जिल्ह्यातील 21 संत महंतांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच हिंदू धर्मात असलेल्या सर्व जातीच्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन खा.चिखलीकर यांनी केले.