नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या दुसर्या दिवशी बाल गंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “उद्रेक” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
एक माणूस अंतर मन आणि बाह्य मनाच्या साह्याने दोन भूमिका जगत असतो. जेंव्हा अंतर मन एखाद्या कारणाने हावी झाला आणि व्यक्ती जेंव्हा अंतर मनाच्या सहाय्याने जगायला सुरवात करतो, त्याचा अतिरेक होतो तेंव्हा अनेक अडचणी निर्माण होतात. याच विषयाला अनुसरून असलेल्या उद्रेक या नाटकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
सुदीप खळीकर आणि श्रद्धा वडसकर यांनी साकारलेले वास्तववादी नेपथ्य विषयाशी अनुरूप होते. सिद्धांत उमरीकर यांनी प्रकाशयोजना उत्तमरीत्या साकारली तर संगीत- रागिणी कुरुंदकर आणि संदीप राठोड , रंगभूषा व वेशभूषा- संजना लकारे आणि अनुराधा वायकोस, रंगमंच व्यवस्था- प्रवीण वायकोस, कैलास सुळसुळे, मनीषा माळी, राजर्षी राठोड, दिलीप घुमरे, भास्कर आसेवार, प्रमोद जहागीरदार यांनी साकारले.
यात मदन आणि मोहन अशी दुहेरी भूमिका साकारणार्या प्रकाश बारबिंड यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात अनिकेत शेंडे, विश्वास कत्ते, सुनील ढाकणे, अनिरुद्ध परांडकर, संपदा झाडगावकर, मनीषा उमरीकर, अनिता आसेवार, अनिल मूळजकर यांनी आप आपल्या भूमिकेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दि. 3 मार्च रोजी स्वप्न रंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने सुदाम केंद्रे लिखित, श्याम डुकरे दिग्दर्शित विनोदी नाटक “टकले रे टकले” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.