नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे कुसुम सभागृहात संपन्न होत आहे. स्पर्धा जस जसी पुढे जात आहे, तस तसे स्पर्धेत रंगत वाढत आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नटराज कला विकास मंडळ, जिंतूरच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित"धर्मदंड" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
या नाटकात सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक काळात दुष्ट विचारांच्या व्यक्ती असतात आणि त्या जात धर्म यांच्या वादळात सर्वसामान्य माणसांना ओढून मानवधर्माला धोका निर्माण करतात. याच मानव धर्माची आठवण करून देणारे नाटक म्हणजे धर्मदंड. महाभारतातील चक्रव्यूहात लढता लढता धारातीर्थ पडलेला अभिमन्यू आणि आजच्या काळातील अभिमन्यू जाती धर्माच्या चक्रव्यूहात गांधी विचाराने धर्मवाद, जातिवाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
यात महात्मा गांधीजी यांची भूमिका साकारणारा प्रकाश शिंदे, अभिमन्यू - तुषार चौधरी, आज्जी - वर्षा जोशी पाटील, लताबाई - सुनंदा डिघोळकर, महाराज - कमलकिशोर जैस्वाल, कुलकर्णी गुरुजी - त्र्यंबक वडसकर, इक्बाल चाचा - संकेत गाडेकर, भुजंग - योगेश गुंडाळे, सिकंदर - रणजीत आगळे, हरी - हरिभाऊ कदम, विठ्या - सोहम खिल्लारे, रेहमान - दिनेश नरवाडे, पाशा - गोविंद मोरे, रिपोर्टर २ : वेदांत पाटील, अमिना, रिपोर्टर - ऐश्वर्या कामतिकर यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला.
त्र्यंबक वडसकर आणि अनिल साळवे यांनी साकारलेलं आशयपूर्ण सूचक नेपथ्य आशयानुरूप होते. बालाजी दामुके यांनी साकारलेली प्रकाशयोजना नाटकाची उंची वाढवण्यास मदत करते. अतुल साळवे यांचे संगीत विषयाशी अनुरूप होते तर अर्चना जैस्वाल आणि श्रावणी गुंडाळे यांनी रंगभूषा साकारली. रंगमंच व्यवस्था हरिहर बुचाले आणि खालिद मामु यांनी सांभाळली.
स्पर्धेतील पुढील नाटक ८ मार्च रोजी सरस्वती प्रतिष्ठाण, नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, स्वाती देशपांडे दिग्दर्शित "कळा या लागल्या जीवा" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण होणार आहे.!