सुजाता ग्राम वॉश योजनेअंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलचे खडकूत येथे उद्घाटन
नांदेड| रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रयोगामुळे पाणी पातळीमध्ये दिवसेंदिवस आता होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गाव पातळीवर देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत. पाणी वापर सर्वात जास्त महिला वर्गांमध्ये होत असला तरी त्याची किंमत देखील महिलांनाच असते. आज खर्या अर्थाने महिला वर्ग प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. याचा मला सार्थ अभियान असून महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घ्यावा यासाठी मी सदैव तत्पर असेल असेे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
नांदेड तालुक्यातील खडकूत येथे बुधवारी दि. 2 मार्च रोजी रमाई लोक संचलित साधन केंद्र अर्धापूर संचलित सुजाता ग्राम वॉश योजनेअंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरीक सरपंच दमयंतीबाई बुक्तरे ह्या होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी, नांदेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांडूरंग नारवडकर, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मार्गदर्शक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या की, गवंडी कामातही महिला सर्वप्रथम खडकूतमधूनच तयार झाल्या असून हा एक प्रकारे बांधकाम क्षेत्रात महिलांचा प्रवेश झाल्याचा इतिहास खडकूत गावात निर्माण झाला आहे. यासाठी पुढील काळात जेव्हा मी याठिकाणी परत येईल तेव्हा या गावात देखील गावातील मुली अधिकारी झाले असल्याच्या मला पहायचे आहे. यासाठी सर्व महिलांनी आतापासूनच आपल्या विविध कार्यासोबत आपल्या मुलींना अधिकारी करण्याचे स्वप्न या जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने पूर्ण केली पाहिजे, अशा आशावाद देखील मी याठिकाणी व्यक्त करते, असे सांगत विहीर पुर्नभरणाचा उल्लेख देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त करून दाखवला. प्रत्येक गावातील विहीर पुर्नभरणाचे काम देखील जलद गतीने व्हायला पाहिजे, अशा सुचना देखील त्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम अतिशय स्तुुुत्य असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी सांगितले.
गावाने पाणी साठवणीकीबाबत चांगल्याप्रतिचे नियोजन करण्याचा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला. तर पाण्याची पातळी रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल, यात शंका नाही. आपल्या गावाप्रमाणेच इतर गावांनी देखील या मॉडेलचा सदउपयोग आपल्या गावपातळीवर करावा असे मत प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषीकेश कोंडेकर तर आभार दादाराव बुक्तरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमा दामोधर, रोहन कोंडेकर, बबरू कंकाळ, प्रभाकर कंकाळ, सरपाते आदींनी परिश्रम घेतले.
महिलांच्या डोक्यावर हेल्मेट...पुर्वी महिलांच्या डोक्यावर पदर असायचा. आता महिला सक्षमीकरण व बांधकाम क्षेत्रात महिला पुढे आल्यामुळे मला आज महिलांच्या डोक्यावर हेल्मेट दिसल्यामुळे आनंद झाला असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी याप्रसंगी केले.