धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांचे मत ; खुरगाव नांदुसा येथील चार भिक्खूंना उपसंपदा
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते धम्मघोष, भंते श्रद्धानंद यांची उपसंपदा पवित्र बुद्धगया येथील धम्मराजा महाविहार ब्रमी टेम्पल येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाला भदंत सुंदरा महाथेरो ( म्यानमार), भदंत प्रज्ञादिप महाथेरो ( बुद्धगया), भदंत पंय्याबोधी थेरो ( नांदेड )भदंत राजहिदा महाथेरो ( म्यानमार), भदंत तेजोभस्सा थेरो ( ब्रम्हदेश), भदंत सुमनगला थेरो ( ब्रम्हदेश ), भदंत धिरा थेरो ( ब्रम्हदेश ), भंते इंधानंदा ( ब्रम्हदेश), भंते राजधम्मा ( ब्रम्हदेश) भंते सुमनपाल ( ब्रम्हदेश ) यांची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील चार उपसंपदा प्राप्त झालेले भिक्खू हे कायमस्वरूपी भंते बनले आहेत. धम्माचा प्रचार आणि प्रसार ते चांगल्याप्रकारे करतील. असा विश्वास नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा नांदेड जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केला. आत्तापर्यंत ह्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातून पाचशेहून अधिक उपासकांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली आहे. आता चार कायमस्वरूपी भिक्खु तयार झाले आहेत. ही नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे अडिच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी जगभरात शातंता नांदावी म्हणून जीवनभर धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्याप्रकारे केला. हा आदर्श घेऊन आजचा भिक्खू संघही हाच संदेश देत आहे.
पुढे बोलताना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याचा जन्म मिळणे कठीण आहे. त्याहूनही सद्दम्म ऐकावयास मिळणे कठीण आहे. श्रमण होणे कठीण आहे. उपसंपदा मिळणे कठीण आहे. तसेच शुद्ध धम्माचे पालन करणे कठीण आहे. यासाठी विपश्यनाही केली पाहिजे. आयुष्यात कायमस्वरूपी चिवर नाही घेता आले तरी किमान दहा दिवसांसाठी श्रामणेर दीक्षा घेऊन धम्म चळवळीला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. जगातील लोकांनी बुद्धाने शिकवलेल्या मैत्रीचा, करुणेचा, शिल समाधी, प्रज्ञेचा तसेच दहा पारमितांचा विनाविलंब अंगिकार करुन संपूर्ण विश्वातील मानवजातीसहीत तमाम प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी कार्य करावे अशी अपेक्षा भदंत पंय्याबोधी यांनी व्यक्त केली.