खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने वसमतच्या " वैष्णवीचा " युक्रेन मधून दिल्लीकडे येण्याचा मार्ग मोकळा -NNL


नांदेड/हदगाव,शे चांदपाशा|
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रोमानिया बॉर्डरवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना ४० तास ताटकळत काढावे लागले. त्यात खाण्या-पिण्याच्या व्यवस्था नसल्याने मायनस २ अंश तापमानात विद्यार्थ्यांना रहावे लागले. दरम्यान, भारतीय दुतावासाच्या मदतीने सदर विद्यार्थी रोमानिया विमानतळावरून सोमवारी रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यामध्ये वसमतच्या वैष्णवी जाधवचाही समावेश आहे.खासदार हेमंत पाटील यांनी पुढील प्रक्रिया करून   खासदर संजय राऊत आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधल्यामुळेच वैष्णवीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वसमत तालुक्यातील जुनूना येथील विद्यार्थिनी वैष्णवी विलास जाधव ही वैद्यकीय शिक्षणासाठी मागील तीन वर्षांपासून युक्रेनमध्ये आहे. रशियाने युक्रेनच्या राजधानीवर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकले. त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वसमत तालुक्यातील वैष्णवी जाधव हिच्यासह इतर विद्यार्थ्यांना युक्रेनमधील भारतीय दुतावासांनी रोमानिया बॉर्डरपर्यंत आणून सोडले. 

परंतु, रोमानियाच्या सैनिकांनी त्यांना बॉर्डरकडे येण्यास मज्जाव केल्याने त्यांना तब्बल ४० तास बॉर्डरपासून १ हजार फुट अंतरावर ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर त्यांनी पालकांशी संपर्क साधून तेथील परिस्थिती सांगितली. दरम्यान, वैष्णवीचे काका अलोक जाधव आणि वडील विलास जाधव यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर खासदार पाटील यांनी दिल्लीत तळ ठोकून असलेल्या खासदर संजय राऊत आणि हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया करून घेतली. रोमानिया येथील भारतीय दुतावासाच्या मदतीने सदर विद्यार्थ्यांना रोमानियातील विमानतळावर आणण्यात आले असून त्यांना सोमवारी रात्री विमानाने दिल्लीत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  

 पालकांची प्रतीक्षा संपेना.... जुनूना येथील वैष्णवी जाधव ही तीन वर्षांपासून युक्रेनमधील चेरनिवतंसयी शहरात ब्युकोविनियन  या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिने त्यांच्या घरच्यांना संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली. तसेच सध्याला पिण्याचे पाणी, खाण्याचे साहित्य व लॅपटॉप एवढे साहित्य घेत, रुमानिया बॉर्डरवर पोहोचल्याचे सांगितले. तब्बल ४० तासानंतर या विद्यार्थ्यांना बॉर्डर क्रॉस करता आली असून त्यांचे इमिग्रेशन झाले असल्याचे वैष्णवीने तिच्या पालकांना सांगितले. तसेच नास्ता करून आम्ही सर्व विद्यार्थी विमानतळाकडे निघालो असून तेथून पुढे विमानाने दिल्लीला येऊ, असेही वैष्णवीने सांगितले.

  खासदार हेमंत पाटील यांचे वैयक्तिक लक्ष...मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खासदार संजय राऊत आणि हेमंत गोंडसे यांना दिल्लीत पाठविलेले आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून पुढे संपर्कात आहोत. वैष्णवीचे काका अलोक जाधव, श्रीनिवास भोसले हेही माझ्या संपर्कात असून वैष्णवी मंगळवारी दिल्लीत पोहचेल, असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.तातडीने केलेल्या सहकार्यामुळे विद्यार्थी सुखरूप आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी