प्रज्ञा करुणा विहारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; रंगभरण चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नांदेड| सर्वांना मिळणाऱ्या यशामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सिंहाचा वाटा असून नारीशक्तीमुळेच जगाचा विकासाचा आलेख उंचावला आहे. महिलांचा सन्मान महिला दिनाच्या दिवशी होण्यापेक्षा रोजच झाला पाहिजे. आता सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून केवळ जागतिक महिला दिनादिवशी त्यांचा सत्कार करायचा आणि इतरवेळी मात्र त्यांच्याशी दुजाभाव करायचा, असे न करता वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा गौरव होईल. यासह महिला सक्षम झाल्या तरच देशाची वाटचाल सक्षमतेकडे होईल, असा ठाम विश्वास स्री चळवळीच्या अभ्यासक आम्रपाली मादळे यांनी व्यक्त केला. त्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी लेखिका रुपाली वैद्य वागरे, आकाशवाणी निवेदिका नम्रता वाव्हळे, सहशिक्षिका सारिका नरवाडे, आम्रपाली मादळे, ज्येष्ठ साहित्यिक पांडूरंग कोकुलवार, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, स्तंभलेखक मारोती कदम, आयोजक सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा रमामाता आंबेडकर महिला मंडळाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी आम्रपाली मादळे यांनी आपले परखड विचार व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ८ मार्च हा एक दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. ३६५ दिवसांपैकी एका दिवशी नारीशक्तीचा सन्मान, आदर आणि सत्कार केल्या जातो. त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. अर्धे विश्व म्हणून त्यांचा गौरव करीत असतो. कोणतेही क्षेत्र आता शिल्लक नाही, ज्याठिकाणी महिलांनी स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने स्वत:ला सिध्द केलेले नाही, असे आपण अभिमानाने सांगत असतो. हे सारे खरे असले तरी केवळ एकच दिवस आम्ही महिलांचा सन्मान का करायचा? रोज महिलांना सन्मान तर सोडा, समान वागणूक आम्ही देतो का, याचा तमाम पुरुषवर्गाने विचार करायला हवा. याबाबत सार्वत्रिक चिंतन आवश्यक आहे असेही मादळे यावेळी म्हणाल्या. महिला दिनाच्या औचित्याने रुपाली वागरे, नम्रता वाव्हळे, सारिका नरवाडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील, त्रिरत्न वंदना, भीमस्तुती, गाथापठणानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात विजया मारोती हटकर - प्रथम, पाखी संघरत्न लोणे - व्दितीय, संकेत नारायण गायकवाड - तृतीय, तर उत्तेजनार्थ अनुष्का संघरत्न लोणे, श्रूती प्रकाश हाटकर, दिक्षा प्रकाश गजभारे, स्वदीप संघपाल गोडबोले यांचा समावेश होता. सर्व सहभागी १०० स्पर्धकांनाही सप्तरंगी साहित्य मंडळाकडून प्रमाणपत्र देण्यात आले.
परीक्षक म्हणून मारोती कदम यांनी काम पाहिले. प्रास्ताविक पांडूरंग कोकुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार सुभाष लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गयाबाई हटकर, केराबाई कापुरे, हटकर, शोभाबाई गोडबोले,निर्मलाबाई पंडित, गिताबाई दिपके, शिल्पा लोखंडे, चौत्राबाई चींतूरे, सुमनबाई वाघमारे, आशाबाई हटकर, लक्ष्मीबाई खाडे, धुरपतबाई गजभारे, पूजा कापुरे, निलाबाई कोकरे, धम्मबाई नरवाडे, प्रकाश भोळे, श्याम कापुरे, सुभाष लोखंडे यांनी परिश्रम घेतले.