नांदेड| इयत्ता दहावीची परीक्षा ही करिअर मधील महत्त्वाची पहिली पायरी आहे. त्यामुळे हा पाया भक्कम झाला तर विद्यार्थी आत्मविश्वासी बनतात. रोज नियमित अभ्यास केला तर आपलं करियर घडतं. कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी आज केले.
जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथील उपक्रमशील व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा रात्रीचा वर्ग सुरू केला आहे. त्यास वर्च्युअल पद्धतीने भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी विद्यार्थ्यांची संवाद केला .
जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आणि डायटचे तंत्रस्नेही विषय सहायक संतोष केंद्रे यांनी तंत्र वापरातून हा संवाद घडवून आणला. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे प्रश्न विचारले. या संवादानंतर आमच्या मध्ये आत्मविश्वास आला आहे असे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रारंभी शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती, घरी होणारा अभ्यास आणि शाळेत होणारा अभ्यास अभ्यासात येणाऱ्या अडचणी आदींबाबत चर्चा केली. हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. सर्व शाळांना आवाहन करून अशा पद्धतीने उपक्रम सर्वव्यापी करता येईल असे त्यांनी सांगीतले.
आगामी वर्षात सबंध जिल्हा परिषद अंतर्गत इतर शाळांमध्ये अशा प्रकारे काम करू शकणाऱ्या शिक्षकांकडून उपक्रम राबविण्यात येईल असे वर्षा ठाकूर यांनी म्हटले. शाळेचे मुख्याध्यापक पी.एम. सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले यावेळी उपस्थित होते. वृक्षमित्र फाउंडेशनचे ईश्वर पाटील यांनी या वर्गासाठी व मदत केल्याचे शिवा कांबळे यांनी सांगितले .
शिवा कांबळे हे उपक्रमशील शिक्षक असून प्रतिवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महिना ते रात्रीचा वर्ग घेतात. सकाळी पहाटे चार वाजता त्यांची दिनचर्या सुरू होते ती रात्री अकरा वाजेपर्यंत. सर्व विद्यार्थी शाळेतच मुक्कामाला असतात . त्यांचे जेवण होते. तिथेच ते अभ्यास करतात. उपलब्ध शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवतात. हा उपक्रम पथदर्शी असून शिवा कांबळे यांचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे आदींनी अभिनंदन व सर्वांनी याचे कौतुक केले आहे.