भाकपा प्रणित महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना तालुका शाखा नायगांव (खै.) च्यावतिने पाटबंधारे विश्रामगृह, नायगांव बा.येथे आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कॉ.प्रदिप नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून भाकपाचे जिल्हा सहसचिव शिवाजी फुलवळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा, तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा. भवरे,तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार,मोहन पाटील जोगदर,अशोक बैस आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाकपा प्रणित विचारसरणीच्या विजयी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सन्मान करण्यात आला.त्यामध्ये हिप्परगाचे सरपंच प्रकाश गारोळे,कोठाळा चे संताजी पांढरे,औराळाचे सदस्य साहेबराव गोपुलवाड, डोंगरगावचे उपसरपंच रामोटकर, कोकलेगांवचे सदस्य पांचाळ आदींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.तसेच, महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेची तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक कॉ.देवराव नारे यांनी तर,उपस्थितांचे आभार कॉ.प्रकाश बैलकवाड यांनी मानले.
यावेळी पूढे बोलतांना कॉ.प्रदिप नागापूरकर म्हणाले की, ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली वा चिन्हावर लढविल्या जात नाहीत मात्र तरीही,डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यात मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.प्रत्येक क्षेत्रांतील समाजघटक आपल्या न्याय व हक्काची जाणीव होताच लढा देऊन ते मिळविण्यासाठी सोयीस्करपणे भाकपा व डाव्या आघाडीचा वापर करित असल्याने सद्यस्थितीत आपण राजकीय दृष्ट्या कमकुवत बनलेलो असल्याची खंत व्यक्त करतांनाच तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंघजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये डाव्या आघाडीचे तब्बल ६१ खासदार सत्तेत असले तरीही, त्यांनी त्या सरकारला पाठिंबा देतांनाच सत्तेत लाभाची पदे न घेता देशातील प्रत्येक बेरोजगाराला वर्षातून किमान १०० दिवस रोजगार मिळायला हवा यासाठी प्रयत्नशील होते. त्यातूनच,महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली रोजगार हमी योजना देशपातळीवर महत्वकांक्षीपणे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना म्हणून अस्तित्वात आली व त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी व रोजगाराची उपलब्धता होती.
परंतू,सद्यस्थितीत या योजनेसाठी निधीच्या कमतरतेसह कामांची उपलब्धताही निर्माण होत नाही म्हणूनच या योजनेत गांव पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांची उपेक्षा होते आहे.त्यांना कामानुसारच मिळणारा मोबदला अत्यल्प असून शासनाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची सोयी- सुविधा व ठराविक मानधनही मिळत नाही.त्यासाठी लढा देण्याची गरज असून तो एकजूटीने दिला तरच, निश्चितपणे यशस्वी होईल म्हणून ग्रामरोजगार सेवकांनी संघटनात्मक बांधणी जोमाने करुन आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्न निवारणासाठी व सोबतच, लोकशाहीचा श्वास असलेल्या राजकीय क्षेत्रांतही आपल्या कार्य,कर्तत्वाचा ठसा उमटविण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले.
याप्रसंगी उत्तम हानवटे, काशीनाथ शिंपाळे,सच्चिदानंद पवार,शिवाजी ढगे,हनमंत पारडे,चंद्रकांत शिंदे,संतोष ईबितदार,वाघमारे मनूरकर, आईलवार सुजलेगांवकर, रावसाहेब बेलकर,नारायण गायकवाड,धोंडीबा गायकवाड, दिलीप खंडगांवकर,रोडे देगांवकर,सुरेश वाघमारे,जाधव लालवंडीकर आदींसह नायगांव तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.