नांदेड| पंधरा मार्चला नांदेड येथे श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेच्या भव्य मिरवणुकीमध्ये आठ ते पंधरा वर्षातील मुला मुलींसाठी रामायणातील वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कवि संगम नांदेड जिल्हा संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर आणि स्वागत समिती अध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली आहे.
प्रभू रामचंद्र हे चौदा वर्ष वनवासात होते. त्यावेळी ते ज्या मार्गाने गेले होते. त्या मार्गात त्यांना अनेकांनी मदत केली. परतीच्या प्रवासात त्या सर्वांना भेट देण्याचे वचन रामांनी दिले होते. परंतु वनवास संपण्यासाठी फक्त एक दिवस आधी रावणाचा वध झाला. भरताने राज्यकारभार चालवताना अशी अट टाकली होती की, 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जय प्रभू रामचंद्र परत आले नाही तर दुसऱ्या दिवशी प्राणत्याग करेल. भरताचे प्राण महत्त्वाचे असल्यामुळे रामाने श्रीलंका ते आयोध्या असा पुष्पक विमानातून प्रवास केला. वनवासातील मदत केलेल्या सर्वांना परत भेटण्याचे वचन राम प्रभू पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ज्या ज्या भागात प्रभू रामचंद्र गेले होते त्या त्या भागातून ही रथयात्रा जाऊन रामाचे वचन पूर्ण करणार आहे.
महाशिवरात्रीला श्रीलंकेतील अशोक वाटी मधून ही यात्रा सुरू झाली आहे. रामकथेतील अशा पात्रांच्या स्मृति प्रीत्यर्थ ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे.वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या बालक बालकांना ट्रॉली मध्ये बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रेणुकामाता गाडीपुरा येथून दुपारी तीन वाजता शोभायात्रा प्रारंभ होणार असून जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ, मुथा चौक, शिवतीर्थ, गांधी पुतळा ,चिखलवाडी कॉर्नर, पंचवटी हनुमान मंदिर मार्गे मल्टीपर्पज हायस्कूल पर्यंत जाणार आहे. त्यानंतर मल्टीपर्पज हायस्कूलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या कविसंमेलनात नांदेड जिल्ह्यातील २१ संत महंतांचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच हिंदू धर्मात असलेल्या अठरापगड जातीच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जातीच्या जिल्हा कार्यकारिणीने आपल्या जातीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाची शिफारस समितीकडे करावी. वेशभूषा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार, धीरज स्वामी, श्रीराज चक्रवार,महेश देबडवार, चेतन पंडित,गणेशसिंह ठाकूर,संतोष ओझा, नरेश आलमचंदानी,शिवासिंह ठाकूर,लक्ष्मीकांत कळणे, विकास परदेशी हे परिश्रम घेत आहेत.