नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच भदंत पंय्याबोधी थेरो हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बाबासाहेबांचा धम्मविचार पंय्याबोधी थेरो पुढे नेत आहेत अशी माहिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल अन्वीकर यांनी म्हैसा येथील एका कार्यक्रमात दिली. यावेळी येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह अनेक बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकतेच माजी खासदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते थाटात अनावरण संपन्न झाले. यावेळी माजी आ. नारायण पाटील, रामराव पाटील, भाजपच्या डॉ.रमादेवी, तेलंगणा प्रदेश अनु.जातीचे प्रदेशाध्क्ष दयाकर आंदकी, आमदार विठ्ठल रेड्डी, महाराष्ट्र वंचित ब.आघाडीच्या रेखा ठाकूर, फारूख अहैमद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष अँड.प्रसेनजीत आग्रे, सायलूदादा म्हैसेकर, शंकर चंद्रे, नगरसेवक गौतम पिंगळे, डॉ. दगडे, देविदास हासडे, गिरीधर जंगमे, एल.ए.हिरे, भारत वाघमारे, अॅड.शंकर गडपाळे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, राष्ट्रीय प्रबोधक राहुल अन्वीकर यांच्या बुद्ध भीम गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना अन्वीकर म्हणाले की, भदंत पंय्याबोधी थेरो हे नांदेड तालुक्यातील खुरगाव येथे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र चालवित आहेत. यात पाचशेहून अधिक उपासकांना श्रामणेर दीक्षा दिली आहे. धम्म प्रचार आणि प्रसाराचे भरीव कार्य ते करीत आहेत. तसेच दहा फुटांची संगमरवरी दगडाची अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती तेथे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आपण भरभरून दान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.