जिल्हा परिषदेचा कारभार भाजपच्या हाती द्या: ७० वर्षात न झालेला विकास करून दाखवू: खा.चिखलीकर यांची ग्वाही -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
नांदेड जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाची सत्ता होती मात्र या सत्तर वर्षात नांदेड जिल्हा परिषदेने ग्रामीण विकासाचा शाश्वत विकास केला नाही. किंबहुना भ्रष्टाचाराचे जुमले उभारले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला विकासाच्या नव्या पर्वावर नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याच हाती जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या द्या विकास मी करून दाखवतो, अशी ग्वाही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा सर्कलमधील कार्यकर्त्यांचा  कौटुंबिक स्नेह संवाद मेळावा नवघरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम, भटक्या विमुक्त जाती महाराष्ट्र राज्य समन्वयक देविदास राठोड, देविदास महाराज गीते, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भगवानराव राठोड, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा चित्रलेखाताई गोरे, सौ.औरादकरताई, युवा मोर्चाचे साईनाथ कोडगिरे, माजी नगराध्यक्ष चैतन्य केंद्रे, गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर डांगे, उत्तमराव पाटील जाधव  यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी कौटुंबिक स्नेह मेळाव्यात  पुढे बोलताना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात काँग्रेसकडे गेल्या 70 वर्षांपासून सत्ता आहे. मात्र या सत्तर वर्षाच्या काळात नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने शाश्वत विकासासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उलट विकासाच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांची पोट भरण्यात आली असे सांगून ते म्हणाले लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांमध्ये अशोक चव्हाण यांनी नाव घेता येईल असे कोणते काम केले हे जाहीरपणे सांगावे असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.

नुकत्याच झालेल्या देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा राज्यात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने टाकलेला हा विश्वास असून आता नांदेडकरांची बारी आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या जोपर्यंत भारतीय जनता पार्टीकडे येणार नाहीत तोपर्यंत नांदेड जिल्ह्यातील जनतेला खऱ्या अर्थाने विकास दिसणार नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेच्या गैरव्यवहाराला आळा लावून सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीकडे जिल्हा परिषदेचे सूत्रे भाजपाच्या हाती द्या असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, निवडणुका जिल्ह्यातील कोणत्याही भागात असोत काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केल्या शिवाय मत मागताच येत  नाही. नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंधार लोह्याचा विषय अशोक चव्हाण यांनी केला. त्यामुळे नांदेडच्या काँग्रेसला जनतेचा विकास नाही तर जनतेला भूलथापा मारून वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे, अशी टीकाही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी नांदेड - बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावला. नांदेड - लोहा - लातूर, बोधन - मुखेड - लातूर या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या एक - दोन महिन्याच्या दोन्ही नवीन मार्गाला निश्चितपणे मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना नांदेड जिल्ह्यातून ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली ती राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या विकासाची नवी वाटचाल होईल. ही किमया केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे जनतेने आता काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला बहुमत द्यावे विकास निश्चितपणे करू असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी