मराठा सेवासंघाकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न
मुखेड, दादाराव आगलावे। बहुतांशी मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, या भूमिकेतून आपण समाजासाठी गेल्या २५ वर्षांपासून आपणासमवेत काम करत आहे. मला आजवर मला भरभक्कम पाठबळ दिले. आपले पाठबळ पहाता मी अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढत राहीन, हा जिल्हास्तरीय पुरस्कार मी समाजबांधवांना समर्पित करतो’’ असे मत भागवत पाटील बेळीकर यांनी व्यक्त केले. यांनी व्यक्त केले.
जिजाऊ ज्ञान मंदिर येथे मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा नुकताच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत बोडके होते तर पत्रकार दादाराव आगलावे, मराठा सेवा संघाचे सचिव शिवाजी पाटील इंगोले, नामदेव पाटील सूर्यवंशी, बळवंत डावकरे,जगदीश जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
भागवत पाटील बेडेकर पुढे म्हणाले की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना मी पुरस्काराची कधीही अपेक्षा केली नाही. सेवानिवृत्तीला केवळ १४ महिने शिल्लक आहेत अनेकांच्या पुरस्कारासाठी मी स्वतः शिफारशी केल्या परंतु मला पुरस्कार मिळावा असे कधीही वाटले नाही. पुरस्काराची शाल माझ्या पाठीवर पडली त्याचे भान ठेवून मी समाजासाठी व शिक्षण क्षेत्रात काम करत राहीन. यावेळी दादाराव आगलावे यांनी भागवत पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे कार्य एवढे मोठे आहे की यांना राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.अध्यक्षीय समारोप करताना यशवंत बोडके म्हणाले की भागवत पाटील म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. कुठल्याही स्तुत्य कार्य ते आवर्जून उपस्थित राहतात. सहकार्य करणे त्यांचा हातखंडा आहे. पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव शिवाजी पाटील इंगोले यांनी केले तर पद्माकर जवळदापके यांनी आभार मानले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख गजानन पाटील जाधव, गंगाधर वडगावे, शिंदे सर, ज्ञानेश्वर साळुंके, ज्ञानेश्वर जगताप, सुधाकर जोगदंड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.