पुणे| कार्पोरेट सामाजिक जबाबदारी( सीएसआर) क्षेत्रात उल्लेखनीय, अभिनव आणि उत्तम कामगिरी केल्याबद्दल, सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांना चित्रपट अभिनय आणि पर्यावरणसंवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड, वनसंवर्धनाचे कार्य सयाजी शिंदे करीत आहेत. हा सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात रविवारी आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मानवतेच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सात श्रेणीत सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आले.प्रकाश आमटे,श्रीमती मंदाकिनी आमटे,स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर,क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यासहित अनेक व्यक्ती,संस्थाना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
कृषी आणि ग्रामविकास,कोविड-19 दरम्यान केलेले मदतकार्य,शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण,आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता,क्रीडा तसेच महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण अशा क्षेत्रांत हे पुरस्कार प्रदान केले गेले.