'एक सुरीली शाम-शहीद कॅप्टन सुशांत के नाम' कार्यक्रमाला प्रतिसाद
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे| सुरांच्या साथीने हुतात्मा सैनिकांच्या वीरमरणाचे कृतज्ञ स्मरण करीत कॅप्टन सुशांत गोडबोले यांना रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.आगामी शहीद दिनानिमित्त,शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'यादे-एक सुरीली शाम,शहीद कॅप्टन सुशांत के नाम' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार,२० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
या कार्यक्रमामध्ये देशरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या सहा जवानांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेवर जखमी होवून अवयव गमावलेल्या तीन जवानांचा सन्मान करण्यात आला. सुरेश कुमार करकी,धनकुमार लांबा,फुरबू रिंडॉल या तीन जवानांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडीयर प्रसाद जोशी,पॅरॅप्लॅजिक रिहॅबिलिटेशन सेंटरचे प्रमुख कॅप्टन भार्गव,नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते वीरमाता मीरा मुरादे,सोनाली फराटे,नीशा गलांडे,शीतल जगदाळे, दिपाली मोरे,वर्षा तांबे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडीयर प्रसाद जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या काही आठवणी सांगितल्या.वीरमाता गीता गोडबोले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.ते पुढे म्हणाले वीरमाता,वीर पत्नी यांना सर्वसामान्य जनतेने समजून घेतले पाहिजे,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.त्यांना शक्य ती मदत केली पाहिजे.आपले जवान आपलं रक्षण करतात म्हणून आपण होळी,दिवाळी आनंदाने साजरी करू शकतो हे विसरून चालणार नाही.
कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या बदद्ल त्यांचे मित्र आणि त्यांच्या युनिटमधील अधिकारी यांचे मनोगत चलचित्राद्वारे दाखविण्यात आले.इ.स.२००3 साली वयाच्या २३ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे,लायन्स क्लबचे पदाधिकारी अभय गांधी,शरदचंद्र पाटणकर,शुभांगी पाटणकर,ब्राम्हण युनिटी फाऊंडेशन,आनंद सराफ यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले म्हणून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांसह सर्व प्रकारची हिंदी गीते सादर करण्यात आली. यामधे 'कर चले हम फिदा वतन साथीयो','संदेसे आते है','वंदे मातरम' अशा देशभक्तीपर गीतांसह इतर अनेक हिंदी गीतांचा समावेश होता.सत्यम शिवम् सुंदरम्, लग जा गले,माँग के साथ तुम्हारा अशी सदाबहार गीते अर्चना पोतनीस,डॉ.भक्ती दातार,अमित जोशी,विठ्ठल प्रभू यांनी सादर केली.हर्षद गनबोटे,सोमनाथ फटके,शरद आढाव,सय्यद खान,अमन सय्यद यांनी साथसंगत केली.कीर्ती रामदासी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची संकल्पना कॅप्टन सुशांत यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांची होती. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११६ वा कार्यक्रम होता.