नांदेड। महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा उत्तरार्धात पोहचत आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशी सरस्वती प्रतिष्ठाण, नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, स्वाती देशपांडे दिग्दर्शित "कळा या लागल्या जीवा" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण झाले.
भारताने जागतिक अर्थव्यवस्था स्विकारल्या मुळे, मध्यम वर्गीय माणसाच्या हातात पैसा खूळखुळू लागला कोणत्याही गोष्टीसाठी सहज कर्ज उपलब्ध होऊ लागले. विदेशी कंपन्या जश्या भारतात आल्या तशी काही प्रमाणात विदेशी संस्कृतीही आली. सहज मिळणारे कर्ज घेणे मग त्याचे हाप्ते फेडताना ओढाताण होणे हे चित्र गल्लो गल्ली दिसु लागले. कारण आंथरूण पाहून पाय पसरावेत ही विचारसरणी जाऊन पाय पसरविण्यासाठी आंथरूण मोठे करा ही विचारसरणी वाढू लागली. म्हणून माणसाच्या गरजा वाढल्या.
आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही तडजोड करू लागला हा विषय तसा चाहूल नाटकाचा. हेच नाटक पाहून अशीच तडजोड आपल्या जिवनात करावी असे ठरवणारा नायक अविनाश आपल्या बायकोला गौरीला घेऊन हे नाटक बघायला जातो आणि ते नाटक गौरीला आवडत नाही. आणि त्या नंतर नवरा बायको मधील वाद, संवाद, चर्चा आणि त्या नुसार घडणारे प्रसंघ म्हणजे "कळा या लागल्या जीवा"
अविनाश आणि गौरी या दोनच पत्रांवर उभा असलेल्या या नाटकाचा डोलारा वर्धन चौधरी आणि माधुरी लोकरे या कलावंतांनी उत्तम सांभाळला. वॉचमनची भूमिका चक्रधर खानसोळे यांनी साकारली. अक्षय भाले यांनी आशयपूर्ण सूचक नेपथ्य साकारले, तर सुहास देशपांडे यांनी प्रकाशयोजनेची बाजू सांभाळली, ईश्वर मचकटवार यांचे संगीत विषयाशी अनुरूप होते, स्नेहा शिंदे आणि डॉ. उज्वला सदावर्ते यांनी रंगभूषा आणि वैशभूषा साकारली.