नांदेड| ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे कुसुम सभागृहात संपन्न होत आहे. स्पर्धेत आत्तापर्यंत एकूण ११ नाट्य प्रयोगांचे सादरिकरण झाले. ही स्पर्धा आता उत्तरार्धात पोहचली आहे. १४ मार्च रोजी "अस्वस्थ वल्ली" या नाट्य प्रयोगाणे स्पर्धेची सांगता होईल.
स्पर्धेच्या अकराव्या दिवशी ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित "जयभीम निळासलाम" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण झाले. दलित रंगभूमिवरील या नाटकाने या आधीच प्रेक्षकांची मने जिंकली होती. हे नाटक पुन्हा स्पर्धेत सादर होणार म्हणून रसिक प्रेक्षकांनीही सभागृहात गर्दी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सुरू होणारे नाटक समाजातील विविध जाती परंपरा, रूढी यावर ताशेरे ओढते. समाजातील शिकलेल्यानी, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, इतर दबल्या, कुचल्या गेलेल्या समाजातील लोकांसाठी काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाला आप आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे नाटक रसिक प्रेक्षकांना मात्र भुरळ घालते.
या नाटकात विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला तर श्रेयस कुलकर्णी, वैष्णवी खलसे, रोहिणी गजभारे, अनिल दुधाटे, सुनील बोकेफोडे, नागसेन गायकवाड, मितेश मोरे, सिद्धांत दिग्रस्कर, आदित्य जोंधळे, सम्राट डोईबळे, मनोज कदम, आलोक गजभारे, ओम पवार, संचीत गोडबोले, बिलाल शेख, सुगत कांबळे, विशाल, रोहित सूर्यवंशी, यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाचे नेपथ्य अविनाश बोना कुडकेवार आणि ज्योतिबा हनुमंते यांनी साकारले तर प्रकाश योजना : माणिकचंद थोरात, वेशभूषा: करण गुडेवार, रंगभूषा: संदेश वाघमारे, संगीत: सचिन वानोळे यांनी आशयानुरूप साकारली.
दि. १२ मार्च रोजी शाक्य सर्वांगीण विकास प्रतिष्ठान, परभणीच्या वतीने नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित "यशोधरा" या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. दि. १३ मार्च रोजी तन्मय ग्रुप, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित "२८ युगांपासून मी एकटी" या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.