हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत डेटा दुरुस्तीचे काम रखडल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. त्यामुळे तात्काळ डेटा दुरुस्ती करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक गजानन वानखेडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकरी किसान सन्मान योजनेच्या मदतीपासून वंचित आहेत, यास येथील महसूल विभागाचे अधिकार- कर्मचारी कारणीभूत आहेत. मागील २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयास आदेशित करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत डेटा दुरुस्तीचे कैम्प आयोजन करण्याचे सूचित केले आहे. यास ८ दिवसाचा कालावधी लोटला मात्र अद्यापही कैम्प लावला नाही. तसेच वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही.
या कामास दिरंगाई करणाऱ्या संबंधीत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि तातडीने डेटा दुरुस्तीचे कैम्प आयोजन करून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक गजानन वानखेडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. तातडीने हा प्रश्न मार्गी लागलं नाहीतर वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.