रात्रंदिवस माळ पोखरला जात असल्याने पर्यावरण धोक्यात
हिमायतनगर| तालुक्यातील सोनारी फाटा नजीक असलेल्या माळरानावरून मागील काही दिवसापासून मुरमाचे विनापरवाना अवैद्य रित्या उत्खनन सुरूच असून, याकडे वनविभागाच्या अधिकार्यांसह महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी फाटा येथून मध्यरात्री बारा ते चार वाजेच्या सुमारास अवैध रित्या जेसीबी लावून ५ ते १० ट्रैक्टरद्वारे मुरमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करून गौण खनिज नियमाला बगल देऊन केले जात आहे. याकडे मात्र महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सोनारी फाटा हे हिमायतनगर तहसील कार्यालयापासून अकरा किलोमीटर अंतरावर असून, याचा राष्ट्रीय महामार्गाने तहसीलदार यांचे वाहन नांदेड -हिमायतनगर ये- जा करत असते. मात्र आजवर त्यांचे याकडे लक्ष का गेले नाही असा सवाल नागरिक विचारीत आहेत.
मागील वर्षांपूर्वी लॉकडाउनच्या काळात रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने येथून माळवरील झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात तसीलच्या एका नायब तहसीलदारास हाताशी धरून मुरुमाची चोरी करून शासनाला चुना लावला आहे. तेंव्हापासून कोणी ना कोणी गौण खनिज माफिया शनिवार - रविवारी कधी दिवसाढवळ्या तर बाकी दिवशी रात्रीला मुरूम उत्खननाचा खेळ करत आहेत. येथील माळातुन मुरमाची अवैध उत्खनन करून आपले उखळ पांढरे करत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. असे असताना देखील वनविभागाच्या अधिकाऱ्याचे याकडे लक्ष का जात नाही असा प्रश्नही पर्यावरण प्रेमी विचारीत आहेत.
या ठिकाणाहून उत्खनन होत असताना सोनारी सज्जाचे मंडळ अधिकारी, तलाठी, महसूलचे नायब तहसीलदार हे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिक करत आहेत. तर एखादी कार्यवाही केल्यासारखे दाखवून महसूल प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांची शाब्बासकी मिळविण्याचा प्रयत्न करून वरिष्ठांची दिशाभूल करत आहे. मागील काही वर्षापासून सोनारी परिसरातील आत्तापर्यंत मुरुम चोरावर एकही मोठी कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतुन महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मागील अनेक वर्षापासून अवैध मुरमाची उत्खनन करून सामान्य जनतेला अवाच्या सव्वा दराने मुरुम विक्री करून अनेक गौण खनिज तस्करांनी आपले बैंक बैलेंस वाढविले आहे.
त्यामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या गोर गरिबांना या गौण खनिज माफियांच्या मनमानीला बाली पडावे लागते आहे. त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा दराने होणारी लूट व अवैध मुरमाची उत्खनन करणाऱ्या माफीयावर कधी कार्यवाही होणार असा प्रश्न या भागातील जनता विचारीत आहेत. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी लक्ष देऊन सामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी आणि शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून पर्यावरणाला बाधा पोचविणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळाव्यात. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात माळ पोखरुणार्यांना सहकार्य करणाऱ्या हिमायतनगर येथील संबंधित महसूल प्रशासनाचे अधिकारी - कर्मचाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कार्यवाही करावी. आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मरणार्यांना धडा शिकवून महसूल वाढवावा अशी मागणी केली जात आहे.