नांदेड| मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला.
केंद्रातील भाजप सरकारने खाजगीकरण, कंत्राटीकरण व कामगार विरोधी धोरण सुरु केले आहे. केंद्र सरकारने 44 कामगार कायदे रद्द करुन बारा तास काम करण्याची सक्ती करणारे चार कामगार कायदे मंजूर करुन त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात आयटक व अन्य कामगार संघटनांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा) सहभागी झाले.
साखर कामगारांना किमान वेतन व माथाडी कायदा लागू करावा, रेल्वे साखर लोडींग नांदेड व मालटेकडी स्टेशनवरुनच भरणा करावी, रेल्वे मालधक्का व वखार महामंडळ, तहसील गोदामे, साखर कारखाने व औद्योगीक क्षेत्रात माथाडी कायदा लागू करुन दोन वर्षाची दरवाढ कराराची अंमलबजावणी करावी, किमान 85 रुपये वाराई लागू करुन माथाडी लेव्ही लागू करा, हमाल कामगारांचे अधिकार मोडीत काढणारे माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदल त्वरीत रद्द करावे व अन्य मागण्यांसाठी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात कॉ. राजन क्षीरसागर, कॉ.ऍड.प्रदीप नागापूरकर, कॉ.के.के. जांबकर, कॉ.शेख अब्दुल, शेख साबुद्दीन साब शेख इस्माईल, विनोद जोंधळे, राम बाबळे, कॉ.देवराव नारे, शेख अकबर शेख हुसेन, वाजीद खान पठाण, केरबा बाबळे, साहेबराव खंदारे, प्रभाकर गायकवाड, भगवान कापुरे, दत्ता तिडके यांच्यासह इतर कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.