वर्धापन दिनानिमित्त नेत्ररोग व रक्तदान शिबिर
भोकर, रवी देशमुख। येथील सेवा समर्पण परिवार च्या वतीने समर्पित भावनेने काम करणाऱ्या दोन व्यक्तींना मराठवाडा स्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यातील ग्राम सेवा समर्पण पुरस्कार हाडोळी च्या सरपंच श्रीमती अनिता माधवराव अमृतवाड तर कृषी सेवा समर्पण पुरस्कार लोहा तालुक्यातील दापशेड येथील नैसर्गिक शेती करणाऱ्या विश्वनाथ गोविंदराव होळगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली.
मागील तीन वर्षांपासून सेवा समर्पण परिवार सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. सेवा समर्पण परिवार च्या वर्धापन दिनानिमित्त दि २६ मार्च रोजी हाडोळी येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर तर दि २७ मार्च रोजी भोकर येथील तहसील कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सेवा समर्पित भावनेने काम करणाऱ्या दोन व्यक्तींना या वर्षी पासून मराठवाडा स्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला आलेल्या हाडोळी गावचे सरपंच श्रीमती अनिता माधवराव अमृतवाड यांना ग्राम सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे.
तर २०१४ पासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नैसर्गिक शेती करणारे विश्वनाथ गोविंदराव होळगे रा. दापशेड ता लोहा यांना कृषी सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहाणार आहे. सदरील पुरस्काराचे वितरण सेवा समर्पण परिवार च्या वर्धापन दिनानिमित्त दि. २९ मार्च ला कैलास गड भोकर येथे पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामसुधारणा बाबत व्याख्यान होणार आहे.