हिमायतनगर| नगरपंचायत प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून मनमानी कारभार चालवीत आठवडी बाजार, शेळी बाजार, बैलबाजारचा नियमा प्रमाणे लिलाव न करता मर्जीतील लोकांना ठेके देऊन आपला स्वार्थ साधला आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे उत्पन्न घटले असून, याचा परिणाम थकबाकीवर होतो आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी उपोषण सुरु करताच मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयातील हिमायतनगर येथील नगरपंचायतीत मागील पंचवार्षिक काळात अंधाधुंद कारभार चालविला गेला आहे. नगरपंचायतीवर विराजमान झालेल्या सत्ताधार्यांनी ५ वर्षात कोणत्याची विभागाच्या समिती न नेमता संबंधित अधिकारी, आणि मर्जीतील काही कर्मचारी याना हाताशी धरून अंधाधुंद कारभार चालविला गेला आहे. याचे अनेक उदाहरणे रस्ते, नाली बांधकाम, शौचालय, कोंडवाड्याचा प्रश्न, मोकाट गुरांचा प्रश्न, पाणी पुरवठ्याच्या पाणी पुरवठा योजनेचा आणि शहरात बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या पथदिव्यांचा प्रश्न असे इतर अनेक कामात गैरप्रकार झाला असल्याचे शहरातील परिस्थितीवरून पाहावयास मिळत आहे.
एवढेच नाहीतर आठवडी बाजार, शेळी बाजार, बैलबाजारचा नियमा प्रमाणे लिलाव न करता मर्जीतील लोकांना ठेके देऊन आपला स्वार्थ साधला गेला आहे. यंदाच्या लिलावामध्ये असा गैरप्रकार होऊ नये यासाठी जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी आज नागरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन अखेर दुपारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी मागणी मान्य करून नियमानुसार लिलाव केला जाईल. तत्पूर्वी स्थानिक वर्तमान पत्रात जाहीर प्रगटन देऊन पारदर्शक पद्धतीने लिलाव होईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी अनेक शिवसैनिक कार्यकर्ते, नपाचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार, नागरिक उपस्थित होते.