अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांची माहिती
नांदेड| गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेमुळे बंद असलेली अमरनाथ यात्रा यावर्षी 30 जून पासून सुरु होऊन ४३ दिवस चालणार असल्याची घोषणा जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी केली आहे. नांदेड येथून एकोणिसावी अमरनाथ यात्रा एक जुलै ते तेरा जुलै या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
पुरातन काळापासून अमरनाथ या ठिकाणी वर्षभरातून फक्त दोन महिने बर्फाचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी कश्मीर ला जातात.नांदेड येथून सतत अठरा वर्ष अमरनाथ यात्रा अखंडितपणे सुरू होती, पण गेल्या दोन वर्षापासून यात्रा न भरल्यामुळे अनेक भाविक अत्यंत उत्सुकतेने यात्रेची वाट पाहत होते.अमरनाथ यात्री संघाच्यावतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर यात्रेचे आयोजन केल्या जाते.अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुखरुप पार पडावी यासाठी नियमित चालण्याचा सराव व प्राणायाम संपूर्ण भारतात फक्त नांदेड येथेच घेण्यात येते. कितीही आणीबाणीचा प्रसंग आला तरी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत हजारो भाविकांची यात्रा सुखरूप पार पडली आहे.
यावर्षी होणाऱ्या यात्रेत अमरनाथ, वैष्णो देवी, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पटनी टॉप,खिरभवानी शक्तीपीठ, जम्मू अमृतसर, बाघाबॉर्डर या स्थळांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर यांनी विविध ठिकाणी मित्रत्वाचे संबंध जपल्यामुळे नांदेडच्या यात्रेकरूंचे जागोजागी भव्य स्वागत करण्यात येते. यात्रा कालावधीतील प्रत्येक दिवशी चा वृत्तान्त नांदेड आकाशवाणी केंद्र तसेच विविध वृत्तपत्रातून प्रकाशित केला जाणार आहे.फक्त सत्तर जागा शिल्लक असल्यामुळे इच्छुकांनी सहा पासपोर्ट फोटो,आधारची झेरॉक्स व नोंदणी शुल्क रुपये दहा हजार भरून भाऊ ट्रॅव्हल्स, कलामंदिर समोर नांदेड अथवा बन्नीज प्लेरूम, व्हिडीओ गेम्स,शॉप नं जी सहा, राज मॉल, आनंद नगर, नांदेड येथे त्वरित नोंदणी करावी असे आवाहन अमरनाथ यात्रेचे संघातर्फे करण्यात आले आहे.