नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे अबाबकरच्या जंगलात वनवा पेटला -NNL

घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यावर कार्यवाही करा - मारोती गायकवाड


हिमायतनगर, अनिल मादसवार|
नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे कोण्यातरी कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कचरा पेटवून दिल्याने शहारानजीक असलेल्या ऐतिहासिक अबाबकरच्या जंगलात वनवा पेटला आहे. अगोदरच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात वाऱ्याची झुळूक यामुळे आगीचे लोट संपूर्ण जंगल परिसरात पोचले असून, जंगलात राहणारे अनेक पशुपक्षी, वन्य प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. तर लाखोंची वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी सापडून मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्याच्या नर्सरीसाठी केलेली पाईपलाईन, उभा असलेला ट्रक जळून खाक झाला असल्याचा आरोप केला जात आहे.  या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्याबाबत घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी मारोती गायकवाड या शेतकऱ्याने केली आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरानजीक ऐतिहासिक पांडवकालीन अबाबकरचा माळ (जंगल) आहे. या जंगलात १२ वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली हजारो झाडे व औषधी वनसंपत्ती आहेत. येथे वृक्षवेली हिरवीगार असल्याने या जंगलात निल-हरीण, निलगाय, ससे, घोरपडी, रोही, साप, विविध प्रकारचे पशु पक्षी व वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. एवढेच नाहीतर तर जंगला नजीक मारोती गायकवाड या शेतकऱ्याची शेती व नर्सरीसाठी केलेली पाईपलाईन आणि एक ट्रक होता. परंत्तू आज सर्व होत्याचे नव्हते झाले आणि यात शासकीय मालमत्तेसह शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे रुद्ररूप टेभी गावापर्यंत पोचले असून, येथील मुस्लिम कब्रस्थानीला देखील आगीचा फटका बसला आहे.


नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्याने गेल्या काही महीन्यापासून या जंगलाच्या काठावर थेट रस्त्याला भिडून घनकचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांनी या प्रकाराचा विरोध करून नगरपंचायत प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निवेदने देऊन घनकचरा टाकण्याचे बंद करण्याची मागणी केली होती. तरीदेखील आंदेगाव, टेभी, भुरकडी, पवना, आदी भागातील गावकऱ्यांच्या मागणीला न जुमानता येथे घनकचरा टाकण्याचा कारभार सुरु ठेवल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नेहमीप्रमाणे शहरात उचललेला सुका व ओला कचरा येथे टाकून एकत्र झाल्यानंतर आग लावून देण्याचा प्रकार मागल्या अनेक वेळा झाला. मात्र सध्या उन्हाळा असल्याने सकाळी नगरपंचायतीच्या कोण्यातरी कर्मचाऱ्याने कचरा पेटून निघून गेला. त्यामुळेच आगीला हवा लागून जंगलात वनवा पेटला असल्याचा आरोप मारोती गायकवाड आणि साईनाथ देशमवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. 


दरम्यान हा प्रकार लक्षात येताच नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थांना अधिकाऱ्याने अग्निशमन बम्ब पाठवून घनकचऱ्याला लागलेली आग तर विझविली. तोपर्यंत या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण जंगल परिसर पेटला आहे. यामुळे जंगलातील लाखोंची वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी सापडली असून, शेकडो पशु-पक्षी, वन्यप्राणी मृत्युमुखी पडून पर्यावरणाची हानी झाली आहे. एवढंच नाहीतर तर या जंगलात पेटलेला वनवा टेभी गावानजीक जाऊन पोचला असून, येथिल मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानीत आगीमुळे परिसरातील गवत जळून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील झाडे आगीच्या लोटामुळे नुकसानीत आली आहेत. 


यांचं जंगलनजीक शेत असलेल्या गायकवाड यांच्या शेतातील नर्सरीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन आणि त्यांचा उभा असलेला ट्रकही जळून खाक झाला असल्याने त्यांचे ८ ते १० लाखाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी आग कोणी..? लावली आणि का..? लावली याची उच्चस्तरीय चौकशी करावी. झालेले नुकसान भरपाई देऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्या प्रकरणी घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी मारोती गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी