अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेड
नांदेड| जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने दि. 27 मार्च 2022 रोजी परिषदेच्या कार्यालयातील रंगशारदा दालनात संपन्न झालेल्या महिलांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धेत परभणीच्या वर्षा संजय पाटील या सर्वप्रथम आल्या आहेत. या स्पर्धेत नांदेडच्या वैशाली उदय गुंजकर, संध्या गोविंद कांबळे, अनिता चंद्रप्रकाश देशमुख, आदींनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून अनिता नेरलकर व स्नेहलता जाधव ह्या होत्या.
परीक्षकांच्या वतीने बोलताना अनिता नेरलकर म्हणाल्या, “महिलांसाठी असलेल्या या एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी खरे तर परिषदेने अनेक बक्षिसे ठेवली होती. यात महिलांचा अत्यल्प प्रतिसाद प्राप्त झाला, पण या स्पर्धेला नांदेड व परभणी दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धक उपस्थित होते ही जमेची बाजू आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन, 60 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम आलेल्या ‘टकले रे टकले’, द्वितीय आलेल्या ‘28 युगांपासून मी एकटी’ आणि परिषदेच्या वतीने 18 व्या बालराज्यनाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘हो मी चोरी केली’ या नाटकांतील सर्व कलावंताचे आणि राज्यनाट्य स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे याचे कौतुक व सत्कारही करण्यात आले.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. उद्घाटकीय भाषणात नाथा चितळे यांनी आपल्या नाट्यप्रवासाचा आढावा घेत “मी चौथ्या पीढीसोबत लहान होऊन काम करत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्धा करत राहणार. स्पर्धा हा आमच्या कुटुंबाचा वार्षिकोत्सव असतो. नांदेडची रंगभूमी सातत्याने तेवत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. हळूहळू नवनवीन कलावंत माझ्यासमोर मोठे होताना पाहण्याचा योग मला येत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी “बाल रंगभूमी समृद्ध करण्यासाठी जिल्हा पातळीवर जे जे शक्य आहे ते ते आपण करू. यासाठी लवकरच अ.भा.मराठी नाट्य परिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांची एक संयुक्त समिती स्थापन करुया, ज्या माध्यमातून पुढील वर्षीपासून होणार्या बालराज्य नाट्यस्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांना सहभागी करून घेणे सोपे जाईल” अशी महत्त्वपूर्ण भूमिका यावेळी व्यक्त केली. “राज्य नाट्य स्पर्धेत नांदेड येथील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नाटकांचा महोत्सव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने लवकरच घेण्यात येईल” असे सूतोवाच महिला व बाल कल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती अपर्णा हृषीकेश नेरलकर यांनी केले.
“अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून शहरातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे व नाट्यसृष्टीत होणार्या विजेत्या संघांच्या विरुद्ध होणार्या उलट सुलट चर्चेच्या उधाणाला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. नाट्यसृष्टीतील काही विकृती आधी चर्चा करतात आणि नंतर ‘तो मी नव्हेच !’ ही भूमिका घेऊन साळसूदपणे वावरतात हे कुठेतरी थांबले पाहिजे” अशी खंत ‘टकले रे टकले’ या नाटकात भूमिका करणारे नवोदित कलावंत बळी डिकळे यांनी व्यक्त करताना परिषदेने आयोजिलेल्या विजेत्या संघांचा सत्कार करण्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आनंदही व्यक्त केला.
यावेळी अ.भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष नाथा चितळे, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती तथा परिषदेच्या अध्यक्ष अपर्णा हृषीकेश नेरलकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, आर्य वैश्य महिला मंडळाच्या सुधा देवसटवार, शांती वैद्य, तसेच मुलांचे पालक, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी चौधरी यांनी केले तर आभार परिषदेचे प्रमुख कार्यवाह गोविंद जोशी यांनी मानले.