जाती-धर्मामध्ये फूट पाडून राज्य करण्याचे भाजपाचे राजकारण !: नाना पटोले
मुंबई| केंद्रातील सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे मनसुबे चांगले नाहीत. देश अत्यंत वाईट परिस्थीतीचा सामना करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. जातीयवादी शक्तींपासून देश वाचवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ही लढाई सोपी नाही परंतु ह्या शक्तीला हरवण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षातच असून त्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र या, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष इमरान प्रतापगडी यांनी केले आहे.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, डिजीटल सदस्य नोंदणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इमरान प्रतापगडी, प्रभारी अहमद खान, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री अनिस अहमद, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख, इब्राहीम भाईजान, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्यासह अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमरान प्रतापगडी पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष समाजात विष पेरण्याचे काम करत आहे. कर्नाटकातील भाजपाचा एक मंत्री तिरंगा बदलण्याची भाषा करतो आणि देशात त्याच्याविरोधात एक शब्दही उमटत नाही हे अत्यंत घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले पण ते स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानच आज धोक्यात आले आहे. देश वाचवण्याच्या या लढाईत सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आज चार लोकच देश चालवत आहेत. दोन देश विकत आहेत, दोन विकत घेत आहेत आणि चौघेही गुजराती आहेत.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जाती धर्मामध्ये फुट पाडून राज्य करण्याची आहे. मागील ८ वर्षात या पद्धतीचे राजकारण जोरात सुरु आहे. या देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असताना त्याला छेद देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून गेले जात आहे. देशाची संपत्ती विकून देश चालवला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २६ उद्योग नरेंद्र मोदी सरकारने विकून टाकले. देश उद्ध्वस्थ करण्याचे काम सुरु आहे. देशाला या विचारधारेपासून वाचवण्याची गरज आहे. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान यांनीही भारतीय जनता पक्ष व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.