कंधार, सचिन मोरे| स्वामी विवेकानंदांच्या बाह्य व्यक्तिमत्वाकडे पाहताना असे वाटते की ते फक्त संन्यासी होते पण त्यांचे चरित्र सूक्ष्मपणे अभ्यासल्यास असे लक्षात येईल की ते एकाचवेळी संन्याशी आणि योद्ध्यांचे व्यक्तिमत्त्व लाभलेले असामान्य योद्धा संन्याशी हाेते.
आजच्या काळात दिशाहीन झालेल्या तरुणांना राष्ट्रभक्ती, समाजसेवा, मातृभक्ती या आदर्श मूल्यांना समजून घ्यायचे असेल तर विवेकानंदांचे प्रेरणादायी चरित्र आत्मसात करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री शिवाजी कॉलेज कंधार च्या रासेयो विशेष शिबिरातील बौद्धिक व्याख्यानादरम्यान प्रा.डॉ.जयराम सूर्यवंशी यांनी केले.
दिनांक 24 ते 30 मार्च 2022 यादरम्यान श्री शिवाजी महाविद्यालय कंधारच्या रासेयो विशेष शिबिराचे आयोजन मौजे पांगरा ता. कंधार येथे केले गेले आहे. सदरील विशेष शिबिराच्या तिसर्या दिवशी संपन्न झालेल्या बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ व्हि.टी. ठाकूर हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा.डॉ जयराम सूर्यवंशी व शिवाजी कॉलेज कंधारचे प्रा.ज्ञानेश्वर डाखोरे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
प्रा ज्ञानेश्वर डाखोरे यांनी आपल्या व्याख्यानातून देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका विशद केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला श्री शिवाजी कॉलेज कंधारचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ माधव कदम, डॉ उमेश पुजारी, डाॅ.पांडुरंग पांचाळ डाॅ.राठोड यांच्यासह बहुसंख्य स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.