कामगारांच्या मोर्चाने नांदेड दुमदुमले
नांदेड| देशातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने कलामंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चातील गगनभेदी घोषणांनी नांदेड दुमदुमले. तर वीज मंडळ, बँक कर्मचारी, पोस्ट, एलआयसी मध्ये या संपाचा परिणाम दिसून आला. शासकीय कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर वीज कर्मचारी व बँक कर्मचार्यांनी आपापल्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
कामगार कर्मचारी विरोधी धोरणे रद्द करावीत, वाढत्या महागाईला आळा घालावा यासह इतर मागण्यांसाठी देश पातळीवरील आयटक, सिटू, लाल निशाण आदी प्रमुख अकरा संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. आजच्या संपाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील कामगारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. कामगार विरोधी जुने कामगार कायदे पुर्ववत लागू करावेत, चार लेबर कोड रद्द करावेत, खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, एन.एम.पी. च्या नावाखाली सुरु असलेला राष्ट्रीय संपत्तीची विक्री थांबवावी, महागाईला आळा घालावा.
पेट्रोलजन्य, घरगुती वापराचा गॅस पदार्थ करमुक्त करावे, बँकांचे खाजगीकरण रद्द करावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, सर्व क्षेत्रातील कामगारांना सरसकट प्रतिमहा 28 हजार रुपये वेतन निश्चित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य, सफाई, आशा, अर्धवेळ परिचारिका, ग्रा.पं.कर्मचारी आदींना प्रोत्साहन भत्ता अदा करावा, रोजगार निर्मितीची गती वाढवावी, मनरेगाची कामे तात्काळ सुरु करावीत, रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील कर्मचार्यांना सेवा पुस्तिका व वेतनवाढ देण्यात यावी. वीडी कामगार, कंत्राटी सफाई कामगारांना घरकुल योजना लागू करावी.
वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळात कायम रोजंदारीवर असलेल्या कामगारांना नियमित रोजगार उपलब्ध करुन द्यावा. वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळात 1994 पासून कायम रोजंदारीवर असणार्या कामगारांना सेवेत सामावून घ्यावे. कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, न्यायालयीन निवाड्याचा अवमान करणार्या भोकर येथील लागवड अधिकार्यांवर कार्यवाही करावी, सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करुन द्यावे, शिक्षणाचे खाजगीकरण व भगवीकरण रद्द करावे. भगतसिंग राष्ट्रीय रोजगार गॅरंटी ऍक्ट देशात लागू करावा आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकार्यांमार्फत देण्यात आले.
कामगारांच्या निघालेल्या मोर्चात ना.रा.जाधव, ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. विजय गाभणे, कॉ.बी. के. पांचाळ, कॉ.के.के. जांबकर, सुर्यकांत वाणी, कॉ.दिगंबर घायाळे, कॉ. इरवंत सुर्यकर, कॉ. उज्ज्वला पडलवार, कॉ. अब्दुल गफार, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. गणेश संदुपटला, कॉ. शिवाजी शेजुळे, कॉ. गुरुपुठ्ठा, कॉ.माधवराव जनकवाडे, कॉ.केंद्रे मामा यांच्यासह सामाजिक वनीकरण, वनविभाग, आशा वर्कर्स, अंगणवाडी, अर्धवेळ परिचारीका, एमआर संघटना, वीडी कामगार, कंत्राटी सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.