प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या आंदोलनाने प्रशासन ताळ्यावर -NNL

या भागातील नागरी समस्या तात्काळ सोडवण्यासाठी मनपाची बैठक बोलवण्याचे आश्वासन


नांदेड|
प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांनी आज या भागातील अत्यावश्यक नागरी समस्यासाठी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रशासन तात्काळ भानावर आले असून या जीवनावश्यक समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी महापालिकेची आज तातडीची बैठक घेऊन या समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

प्रभाग क्रमांक चार मधील पौर्णिमानगर, समर्थ नगर ,अंबेकर नगर ,सुंदर नगर, नंदीग्राम सोसायटी, गीता नगर, वैशाखी नगर , विश्वनाथ नगर ,शाहू नगर , इंदिरा नगर, नाईक नगर, राहुल नगर, वाहतूक नगर या भागात निवासी मालमत्ता धारककांच्या अनेक समस्या असून ह्या समस्या मागील 45 वर्षांपासून जैसे थे असल्याचा आरोप करीत व या भागातील नागरिकांकडून जाचक अकृषिक कर वसूल करण्यात येतो याच्या विरोधात आज नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर या भागातील नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी नागरिकांनी या प्रभागात मागील 25 वर्षापासून कुठल्याही प्रकारची नवीन द्रेनेज लाईन टाकण्यात आली नाही. पंचवीस वर्षापूर्वी टाकलेली ड्रेनेज लाईन अतिशय जुनाट झाली असून त्यामुळे ती जागोजागी कुजलेली आहे. पाईप फुटल्यामुळे तुंबलेले पाणी अनेक नागरिकांच्या घरात जात जाते. फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी रस्त्यावर साचून या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे डबके तयार होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या भागातील रस्ते ही अतिशय जुनाट असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. 

अनेक भागात साधे कच्चे रस्ते देखील उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर लाईट व पिण्याच्या पाण्याची ही या भागात वाताहत असून नागरिकांनी ह्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी वारंवार या प्रभागाच्या नगरसेवकाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनालाही अनेकदा निवेदने देण्यात आले होते. मात्र या भागाला उपमहापौर, महापौर, आणि स्थायी समिती सभापती असे मोक्याचे पदे लाभल्यानंतरही या भागाचा काहीच विकास झाला नाही. 

वैतागलेल्या या भागातील नागरिकांनी महानगर प्रशासनाला या मागण्या तात्काळ सोडवावेत अन्यथा महानगर पालिकेच्या कार्यालयात समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ गांभीर्याने दखल घेत या भागातील समस्या तात्काळ सोडवण्यासाठी महानगरपालिकेची तातडीची बैठक बोलावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. तात्काळ या भागातील समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यानी आज तूर्तास आंदोलन मागे घेतल्याचे कळविले आहे. 

या भागात जाचक अकृषिक कराची वसुली करण्यात येत आहे. ही देखील तत्काळ थांबवावी अशी मागणीही निवेदनकर्त्यानी केली होती. यावरही तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना महानगर पालिका प्रशासनाने दिले आहे. वारंवार सुचना व मागणी करूनही महानगरपालिका प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आज या प्रभागातील नागरिकांना महानगरपालिकेसमोर करावे लागले त्यामुळे महानगरपालिका तात्काळ भानावर येत या आंदोलनाची दखल घेतली. 

या आंदोलनात दीपक कसबे, चंद्रमणी मांजरमकर, नामदेव इंगळे, प्रभाकर ढवळे, रामा गादेकर, ज्ञानेश यंगडे, सुखदेव मुनेश्वर, यश. डी. हंबर्डे, रोहित कुमार इंगोले, बी.एम. काळे, अंबेकर नगर गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन, गुलाबराव राठोड, पी.जी. सूर्यवंशी, सोपानराव वाघमारे, भाऊराव भदर्गे, विकी टाकळीकर अच्युत पवळे आधी नागरिकांच्या व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हासचिव श्याम कांबळे यांनीही पाठिंबा दिला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी