नांदेड| सिटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चा दिनांक 29 मार्च रोजी जिल्हा परिषदेवर काढण्यात आला. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शालेय पोषण आहार कामगारांच्या व इतर मागण्या सोडविण्यात सपशेल अपयशी ठरत असल्यामुळे जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. असे मनोगत शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे तथा सीटू चे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केले.
मागील सहा महिन्यांपासून शालेय आहार कामगारांचे मानधन थकीत असल्यामुळे व शाळेमध्ये मुख्याध्यापक व शालेय समितीचे सदस्य तसेच अध्यक्ष यांच्याकडून खिचडी शिजविणा-या कामगारांना इतर कामे लावली जात आहेत उदा. शाळा साफसफाई करणे, ते बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पत्र काढून मुख्याध्यापकांना ताकीत देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. शालेय आहार कामगारांना किमान वेतन स्वरूपात 18 हजार पाचशे रुपये मानधन देण्यात यावे. कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे.
कामगारांचे मानधन बँक खात्यावर वर्ग करावे यासह इतरही मागण्या घेण्यात आल्या होत्या. जि प च्या शिक्षण विभागाचे लेखाधिकारी श्री बुरकुले सर व धनंजय घुमटकर यांनी मोर्चा च्या ठिकाणी येऊन जिपचे पत्र दिले व यापुढे शालेय पोषण आहार कामगारांना इतर कोणतेही काम लावलेत जाणार नाही असे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले पत्राची एक प्रत संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांना देखील देण्यात आली आहे. तसेच नांदेड शहरातील वादग्रस्त बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधीनगर नांदेड या शाळेच्या अनुषंगाने देखील संघटनेच्या वतीने तक्रारी निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने उद्या शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र काढण्यात येणार आहे असे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड गंगाधर गायकवाड,कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.लता गायकवाड,कॉ.शीलाताई ठाकूर कॉ.साहेबराव दहिभाते, कॉ. गोपाळ लष्करे, कॉ.दत्ता शिंदे बालाजी गवळकर कॉ.मनीषा धोंगडे आदींनी केले तर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम व ज्येष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे यांची देखील उपस्थिती होती.