यशवंत मनोहर यांची एकाच वेळी चार पुस्तके प्रकाशित
नांदेड| मराठी साहित्यात डॉ. यशवंत मनोहर त्यांच्या रूपाने एक प्रचंड झपाटलेपण मी पाहिले आहे. तसेच विचार जगणे काय असते. हे देखील त्यांच्या सूर्यसाक्षी प्रतिभेत मी पाहिले आहे. आज जवळजवळ शे-सव्वाशे लहान-मोठी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. परंतु या संपूर्ण लेखनप्रपंचात कुठेही अंतर्विरोध वा तत्त्वद्रोह दिसत नाही.
यशवंत मनोहर हे विज्ञाननिष्ठ साहित्यिक आहेत असे प्रतिपादन नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. यावेळी डॉ.पुष्पलता मनोहर, डॉ. मनोहर नाईक, 'सुगावा'चे विनोद शहारे, डॉ. अजय चिकाटे, शिक्षक भारतीचे सपन नेहरोत्रा, प्रियावी प्रकाशनाच्या प्रिया मेश्राम, इंजिनिअर अशोक वासनिक, युगसाक्षी प्रकाशनाचे नितीन हनवते, मॅक्झिम मनोहर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती, अशी माहिती येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
प्रख्यात लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि तत्त्वज्ञ डॉ. यशवंत मनोहर यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. ना. नितीन राऊत यांच्या हस्ते मनोहरांची 'कवी आणि कविता ', 'अनन्य विलास वाघ ' 'नक्षत्रांची वेल' आणि 'मूलतत्त्वी देशीयता की भारतीय वैश्विकता' ही चार पुस्तके प्रकाशित झाली. अत्यंत साध्या पद्धतीने आणि केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रकाशनसमारंभात ना. नितीन राऊत पुढे बोलताना म्हणाले की, यशवंत मनोहर हे स्वतः विचार जगले आणि विचार जगवणारे विद्यार्थी त्यांनी घडवले. वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांशी इतके अगत्यपूर्वक जुळून राहणारा प्राध्यापक मी दुसरा पाहिला नाही.
त्यांच्या आंबेडकरी निष्ठा कायम आहेत. त्या आजपर्यंतच्या जीवन आणि लेखन प्रवासात कुठेही तसूभरही ढळलेल्या नाहीत. या कार्यक्रमाचे राजा करवाडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी आणि खांडेकर या मान्यवरांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश राठोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सर्जनादित्य मनोहर यांनी केले तर पराग मनोहर यांनी आभार मानले.