मुंबई| यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसरी या पूरग्रस्त गावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव महिन्याभरात पाठविण्याच्या सूचना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन या गावातील 99 घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, २००६ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे देवसरी गावातील पूरबाधित १८७ कुटुंबांपैकी ९९ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव शासनाने १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये अमान्य करण्यात आला.
या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन होणे अभिप्रेत असताना हा प्रस्ताव परत केला आहे. त्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी महिन्याभरात हा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि या प्रस्तावाला मान्यता देऊन ९९ घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितले.