वाडी बु. येथे मंजूर झालेल्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अंदाजपत्रकास अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी सचिव समितीने दिली प्रशासकीय मान्यता
विस्ताराने मोठा असलेला नांदेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे बळ कमी पडत होते. त्यामुळे महापालिका वगळता वाडी बु. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. अनेक वेळा शहरासह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गाटणे जिकिरीचे बनत होते. यामुळे नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे नांदेड उत्तर मतदारसंघातील वाडी बु. येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. याबाबत आरोग्य संचालनालयाने 26 मार्च 2021 रोजी हा प्रस्ताव शासनास सादर केला. सदरील प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबतची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सांगितली. त्यावर याबाबतचा विशेष बाब म्हणून दि. 29 जून रोजी स्वतंत्र आदेश काढण्यात आला होता.
सदर उपजिल्हा रुग्णालयातील जवळपास 94 पदासाठी 360.75 लाख, रुग्णालयाची इमारत निर्मितीसाठी 5500.00 लाख, यंत्रसामग्री साठी 300.00 लाख, रुग्णवाहिका खरेदीसाठी 15 लाख, औषध व उपकरणे 250.00 लाख, कार्यालयीन खर्च 3 लाख यासह इतर एकूण अंदाजित खर्च 6431.75 लाख खर्चाचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्यसेवा विभागाने सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी शासनास सादर केला. यानुसार शासनाने या प्रस्तावास मान्य केल्याचे आदेश आरोग्य विभागाचे अवर सचिव प्र. मो. बलकवडे यांच्या स्वाक्षरीने यापूर्वीच निघाले आहेत. 4 मार्च रोजी अवर सचिव, दि.नी. केंद्रे यांनी स्वतंत्र आदेश काढून रुग्णालयाच्या इमारतीसाठी 53 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नांदेड उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. तसेच याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
उत्तर मतदारसंघातून डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी व जिल्हा रुग्णालय येथे जायचे झाले तर वीस किलोमीटर लांबचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे दोनशे ते तीनशे रुपये खर्च होतात. ही बाब सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी आहे. तसेच ही बाब गैरसोयीची असल्यामुळे आ. बालाजी कल्याणकर यांनी वर्षभरात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास आज मंजुरी मिळवून घेतली.
सदरील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम 7263.65 लक्ष इतक्या रकमेचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास विनंती केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने छाननी रुग्णालय इमारतीसाठी रुपये 5334.05 लक्ष इतकी रक्कम परिगणित केली होती, तद्नंतर सदर प्रस्ताव उच्च अधिकारी सचिव समितीसमोर सादर करण्यात आला नांदेड येथील नवनिर्मित 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारतीचे रु. 5334.05 लक्ष इतक्या बांधकाम अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली आहे.
याव्यतिरिक्त रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 12 कोटींचा निधी मंजूर
सदरील रुग्णालयासाठी एकूण वर्ग 1 चे एक पद,वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 ची 13 पदे,वर्ग 3 ची 50 पदे, वर्ग 4 ची 23 पदे व अन्य 7 प्रशासकीय पदे असे एकूण 94 पदे निर्माण करण्यात आली आहेत. उपजिल्हा रुग्णालय स्थापन करणेबाबत ऑर्डर झाली तारीख 29 जून 2021सदरील उपजिल्हा रुग्णालय हे G+2 असून त्याचे क्षेत्रफळ 10106.14 चौ. मी आहे.