नांदेड। नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा नरहर कुरुंदकर पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते आज दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी येथील कुसुम सभागृहात होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर या राहणार आहेत.
कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर शृंगारे, महापौर जयश्री पावडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, डी.पी. सावंत आणि माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लेखक कवींना प्रतिवर्षी नरहर कुरुंदकर पुरस्काराने तर महिलांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन् 2020-21 चा नरहर कुरूंदकर पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील लेखक, कवी देविदास फुलारी यांना तर सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉ. भारती मढवई यांना देण्यात येणार आहे.
देवीदास फुलारी यांचे 13 पुस्तके प्रकाशित झालेली असून पाच आऱ्यांचे चाक, अक्षर नारायणी, वेधांच्या प्रदेशात, कविता क्रांतीच्या, दूधावरची साय ,देश जोडण्याचा खेळ, वसंत डोह, फुलपाखरांचा गाव ही पुस्तकं त्यांची गाजलेली आहेत. त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. एक उत्तम वक्ता आणि साहित्याचे भाष्यकार म्हणून ते सर्व परिचित आहेत.
सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त डॉ भारती दगु मढवई या वैद्यकीय व्यवसायात असून सामाजिक परिप्रेक्षात त्यांचे काम आहे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी सावित्री, जिजाऊ, रमाई, अहिल्याबाई, झलकारीबाई यांच्या भूमिका केलेल्या आहेत. यांचे एकपात्री प्रयोग प्रसिद्ध आहेत. नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्काराची रक्कम प्रति पुरस्कार रुपये दोन लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार - उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी 2019-20 मध्ये प्राथमिक विभागातून 16, माध्यमिक विभागातून 11 विशेष शिक्षक1 आणि प्रायोजित पुरस्कार 7 असे एकूण 35 जणांना गौरविण्यात येणार आहे. 2020-21 या वर्षातील प्राथमिकसाठी 13, माध्यमिकसाठी 13, विशेष शिक्षक 1 आणि प्रायोजित पुरस्कार 7 असे एकूण 35 जणांना गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेल्या एकूण 69 जणांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. मानपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या सर्व पुरस्कारांचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे होणार आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली आहे. कार्यक्रम समन्वयासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आज पुरस्कार वितरणाच्या संदर्भाने विशेष बैठक घेऊन सर्व नियोजन दिले आहे.
पालकमंत्र्यांची ग्रंथतुला - नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार तसेच जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी आयटीएम परिसरातील कुसुम सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा दिनाच्या औचित्याने जिल्ह्यातील वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात येणार असून ग्रंथतुलेतील पुस्तके व विविध मान्यवरांनी दान दिलेली पुस्तके जिल्ह्यातील मराठी भाषिक शाळांना देण्यात येणार आहेत.