कधीकाळी पाणी, उद्योग आणि शैक्षणिक सुविधांचा दुष्काळ असलेला मराठवाडा आता झपाट्याने बदलतो आहे. विविध सिंचन योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या शिवारात पाणी आले, पाणी आहे म्हणून उद्योग आले आणि उद्योग आहे म्हणून त्या उद्योगांची कुशल, शिक्षित-प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी शिक्षणाच्याही सुविधाही उपलब्ध होत गेल्या. आज औरंगाबाद, नांदेड, लातूर सारखी शहरे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरील प्रमुख ठिकाणे बनली आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्राबाबत दाखवलेली दूरदृष्टी किती लाख मोलाची होती, याचा प्रत्यय आपण आज घेत आहोत.
मराठवाड्यातील क्रमांक दोनचे शहर असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा असाव्यात यासाठी त्यांच्यासह जुन्या पीढीतील अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. येथील पिपल्स कॉलेज, यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज यांनी जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर केला. या भागातील मुले आज अखिल भारतीय पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. नीट, सीईटी, जेईई सारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नांदेडचा आवर्जून व सन्मानाने उल्लेख केला जातो. आजमितीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी नांदेडला शिक्षणासाठी येऊ लागले आहेत, यातूनच सारे काही स्पष्ट होते.
सव्वा दोन वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर नांदेडच्या शैक्षणिक विकासाला अधिक गती मिळाली आहे. यापूर्वीही राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी सूक्ष्म नियोजन करून विविध शैक्षणिक सुविधा खेचून आणल्या होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिकडेच मंजूर झालेले नर्सिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.
येथील शैक्षणिक गरजा ओळखून नवीन सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले होते. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडत आहे.
सोमवारी 28 फेब्रुवारी 2022 रोजी विविध शैक्षणिक सुविधांचे लोकार्पण असून, त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचा समावेश आहे. या संकुलासाठी सुमारे 44 कोटी 72 लाख रूपयांचा भरीव निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात प्रशासकीय विभाग, ग्रंथालय व अभ्यासिका, शंभर मुलांचे व मुलींचे वसतीगृह, स्वयंपाक व भोजन कक्ष, फर्निचर आणि जमीन सुशोभीकरणाचा यात अंतर्भाव आहे. ग्रंथालय व प्रशासकीय इमारत ही तळमजला अधिक एक मजला असे हे बांधकाम असेल.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी नवी देखणी वास्तू उभी केली जाणार आहे. यासाठी सुमारे 14 कोटी 41 लाख रूपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला आहे. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या वास्तुमध्ये सात वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, कार्यालय, प्रसाधन गृह, स्टॉप रुम, ग्रंथालय व वाचन कक्ष, फर्निचर असे याचे स्वरुप आहे.
विद्यापीठामध्ये शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचेही बांधकाम केले जात आहे. सुमारे 8 कोटी 21 लक्ष एवढा निधी यासाठी उपलब्ध केला आहे. तळमजला अधिक एक अशा स्वरूपाच्या इमारतीमध्ये एकूण 25 खोल्यांमध्ये शंभर मुलांची व्यवस्था यात आहे. वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता गृहाची सुविधा असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे देखील याच दिवशी भूमिपूजन होईल. या वसतीगृहाची दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता आहे. यासाठी 19 कोटी 35 लाख रुपये अंदाजीत खर्च आहे. तळमजला अधिक तीन मजले असे या इमारतीचे स्वरुप असून एकूण 50 खोल्या त्यात स्वच्छता गृहाच्या सुविधेसह असणार आहेत. याचबरोबर स्वयंपाक गृह, भोजन कक्ष, जीमन्याशियम हॉल, ग्रंथालय व वाचन कक्ष, बहुउद्देशीय हॉल, वसतीगृह अधिक्षकांचे निवासस्थान, फर्निचर व इतर कामांचा यात समावेश आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रशासकीय इमारत व ग्रंथालय इमारतीमध्ये फर्निचरची उपलब्धी करून दिल्याने आता ही इमारत परीपूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे 17 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून यात मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रशासकीय विभाग, कम्युनिटी मेडिसीन विभाग, फॉरेन्सिक मेडिसीन विभाग, दोन वर्ग खोल्या, बायोकेमिस्ट्री विभाग, मायक्रोबायोलॉजी विभाग, पॅथॉलॉजी विभाग, क्लासरूम 2, फार्माकॉलॉजी विभाग, फिजीऑलॉजी विभाग, एनॉटॉनी विभाग, परीक्षा कक्षात कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, ग्रंथालय इमारतीमध्ये कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, रुग्णालय इमारतीमध्ये विविध विभागामध्ये फर्निचर पुरवठा करणे या कामांचा समावेश आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वातानुकुलीत यंत्रणा, बाग-बगीचा, सीसीटिव्ही, लिफ्ट, रॅम्प आदी कामांसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन वास्तु नांदेड जिल्ह्याच्या वाढत्या शैक्षणिक गरजानुरूप आणि नांदेडला एक सुसज्ज असे शैक्षणिक ‘हब’ निर्माण कऱण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणता येईल.
- विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड