नांदेड। मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बारड येथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले उपक्रमशील, तंत्रस्नेही, विद्यार्थी प्रिय शिक्षक, महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री संदीप मस्के सर यांना सत्र 2021 चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
संदीप मस्के यांचे सामाजिक तसेच शैक्षणिक चळवळीतील सक्रिय योगदान पाहून आणि त्यांच्या पंधरा वर्षांच्या सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे. NMMS परीक्षेची तयारी करून घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये या परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र करण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे.
नांदेड जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग 10 वी सेमी इंग्लिश सुरू करून त्या वर्गाचा शंभर टक्के निकाल लावन्यात वर्ग शिक्षक म्हणून सरांचा सिंहाचा वाटा आहे. NTS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, लेझीम कवायत, डंबेल्स कवायत, मानवी मनोरे, विज्ञान प्रदर्शन, विविध प्रकारचे देखावे सादर करणे. यांची त्यांना विशेष आवड आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची त्यांना विशेष आवड आहे. उत्कृष्ट निवेदक व चांगले सूत्रसंचालक म्हणून ते परिचित आहेत. जिल्हास्तरीय इतिहास विषयाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या शिक्षकाचे कार्य पाहून नांदेड जिल्हा परिषदेने सन 2021 - 22 च्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने निवड केली असून नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने 27 फेब्रुवारी 2022 रोजी शहरातील कुसुम सभागृहात दिमाखदार समारंभाचे आयोजन करून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्यांना समारंभपूर्वक पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्काराबद्दल समस्त शिक्षक वर्गातून अभिनंदन व्यक्त होत आहे. शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद हायस्कूल, बारड चे अध्यक्ष श्री विलासराव देशमुख व सर्व पदाधिकारी तसेच बारड ग्रामवासी पालक वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.