निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी -NNL


मुंबई|
पाश्चात्य जगात लिंग समानतेची (जेंडर इक्वालिटी) संकल्पना आहे. परंतु भारतात स्त्रीला मातृशक्ती व पराशक्ती म्हणून पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व दिले आहे. महिला विद्यापीठाच्या स्नातक विद्यार्थिनींनी आपले श्रेष्ठत्व ओळखावे व देशसेवेचा संकल्प करून कार्य करावे. आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 71 वा वार्षिक दीक्षांत समारंभ  राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारंभाला दूरस्थ माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरु रुबी ओझा, प्रभारी कुलसचिव सुभाष वाघमारे, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन संजय शेडमाके, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, महात्मा गांधींनी बॅरिस्टर असताना देशसेवेचा संकल्प केला व स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएसचा त्याग करून देशासाठी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. या महान विभूतींचे आदर्श समोर ठेवून स्नातक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी तसेच देशासाठी कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे.

“विद्यापीठाच्या 32 कोटींच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता”

महिला विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात शासनाने 75 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी 32 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल व निधी विद्यापीठाला दिला जाईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एसएनडीटी महिला विद्यापीठ देशाच्या अनेक भागात पोहोचले आहे. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. राजकारणात सुसंकृत व्यक्तींची आवश्यकता आहे असे सांगून विद्यार्थिनींनी पुढे राजकारणात येऊन समाजसेवा करावी असे त्यांनी सांगितले. कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. दीक्षांत समारंभामध्ये 14,548 विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली. तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना पदके व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.




Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी