नवी मुंबई। कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ जी नाईक महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी वाडमय मंडळांतर्गत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंडळा अंतर्गत दरवर्षी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी देखील मंडळाअंतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा , काव्यवाचन स्पर्धा व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्रा. पुष्पा उदमले यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या लिखित साहित्याबद्दल व मराठी भाषा दिन साजरा करण्याचे महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संतोष जाधव हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना विविध लेखकांचेच साहित्य वाचून मराठी भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी मराठी विभाग मंडळाच्या प्रमुख प्राध्यापिका पुष्पा उदमले व मराठी मंडळाचे सदस्य यांचे सदर कार्यक्रमाच्या उत्तम आयोजना बद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धांमधून सहभाग घेऊन स्वतःची प्रगती करणे आवश्यक आहे असे सांगितले. सदर कार्यक्रमातील काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मानसी वीर (टी वाय बी ए), द्वितीय क्रमांक मयुरी पवार (एफ.वाय. बीकॉम बी), तृतीय क्रमांक मधुरा वाघमारे व ऋतुजा देशमुख (एस वाय आयटी) यांनी पटकावले.कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आरती पानसरे (एफ.वाय. आयटी) द्वितीय क्रमांक ऋतुजा देशमुख (एस वाय टी) व तृतीय क्रमांक अंकिता सुतार (एफ.वाय. बीकॉम) या विद्यार्थ्यांनी पटकावले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदेश सूर्यवंशी यांनी केले व आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्राध्यापिका समिधा पाटील यांनी पार पाडली.
सदर कार्यक्रमासाठी मराठी विभाग मंडळाचे सदस्य प्रा. स्मृतिगंध बिडकर, प्रा. समिधा पाटील ,प्रा. चिन्मयी वैद्य प्रा. संगीता वास्कर, प्रा.संदेश सुर्यवंशी तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले.