मुखेड, दादाराव आगलावे। मानवी जीवनाची सार्थकता ही आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर अवलंबून असते. ज्यांना जगायचे कशासाठी कळते त्यांना जीवनाचा अर्थ समजतो. संकल्प आणि साधना, उक्ती आणि कृती यांच्या एकरुपतेतून माणसाला मोठेपण प्राप्त होते. कर्म सेवामय झाले की जीवन सुगंधित होते, हेच कार्य डॉ. दिलीपराव पुंडे व्याख्यानमाला सुरू करून करत आहेत. मातोश्री भिमाई व्याख्यानमाला म्हणजे विचार चैतन्याचा जागर होय असे प्रतिपादन सातारा येथील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
कै.सौ. भीमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती, मातोश्री भीमाई व्याख्यानमाला दशकपूर्ती व गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात दहावे व्याख्यान पुष्प गुंफताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी नागोराव जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्काराच्या मानकरी श्रीमती विजयाताई मार्तंडराव देशपांडे, गुरुवर्य नामदेव महाराज दापकेकर, व्याख्यानमालेचे आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी भिमाबाई व पांडुरंगराव पुंडे यांचे प्रतिमा पूजन दिपप्रज्वलन करून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे पुढे म्हणाले की, डॉ. दिलीप पुंडे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतींना व्याख्यानमालेचे आणि पुरस्काराचे कोंदण देऊन तरुणाईपुढे मातृ पितृ भक्तीचा आदर्श उभा केला आहे. विजयाताई देशपांडे यांना प्रदान केलेला पुरस्कार हा ज्ञानसंस्कृतीचा आणि सेवावृत्तीचा कृतज्ञ गौरव सोहळा आहे.विजयाताईंनी पुरुषार्थ घडवला आहे. तो पांडुरंगाचा प्रसाद आणि भीमाईचा आशीर्वाद आहे. आज माणसाला पैसा, गाडी, बंगला अशा प्रचंडपणाच्या वेडाने ग्रासले आहे. या वेडापायी माणूस जीवनातील उत्कृष्ट आनंद आणि समाधान गमावत बसला आहे.समाधानी जीवनासाठी साधेपणा जपावा लागतो. मनाच्या शेतीत श्रद्धेची आणि सद्विचारांची बीजे पेरावी लागतात. सत्याची कास धरून कष्टाची उपासना करावी लागते. विकारांचे तण उपटुन मनाची मशागत करावी लागते मगच मनाच्या शेतीतून अमृताची फळे वाट्याला येतात. या व्याख्यानमालेतच 'माला' आहे. सौ. माला पुंडे यांची भक्कम साथ डॉक्टरांना आहे. व्याख्यानमालेचे प्रास्तावित करताना मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे म्हणाले की, मातोश्री भिमाई व्याख्यानमालेच्या माध्यमातून मुखेडवासीयांची वैचारिक भूक भागवण्याचे काम व्याख्यानमालेच्या माध्यमातून आम्ही करत असून माझ्या आई-वडिलांना विचारातून जिवंत ठेवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे.
श्रोत्यांनीं मागील दहा वर्षापासून अभुतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी आमदार डॉ.तुषार राठोड म्हणाले की भीमाई व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य होत आहे. त्यांनी विजयाताई देशपांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली.श्रीमती विजयाताई देशपांडे यांनी मनोगतात सामाजिक चळवळ अधिक गतिमान करुन गोरगरीब गरजूंना सदैव मातृभावाने मदत करणार असे सांगितले. शिवाजीराव जाधव यांनी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक अधःपतन, आईवडिलांची हेळसांड, बदलेली समाज व्यवस्था या बाबत प्रखर विचार मांडले व डॉ. दिलीप पुंडे यांचे कार्य श्रावण बाळासारखे आहे असे प्रशंसनीय उद्गार काढले.
यावेळी श्रीमती विजयाताई देशपांडे यांना मानपत्र ,सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मानपत्राचे वाचन साहित्यिक शिवाजीराव आंबुलगेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार प्रदर्शन व्याख्यानमाला संयोजन समितीचे सदस्य दादाराव आगलावे यांनी मानले. संगीत शिक्षक विरभद्र मठपती यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी फ्लेमींगोचे संचालक डॉ. शिवानंद स्वामी यांनी लाईव्ह चित्रीकरण केले.
कार्यक्रमास रमेश मेगदे, अरविंद चिटमलवार, प्राचार्य हरिदास राठोड, प्राचार्य शिवानंद आडकीने, प्राचार्य मनोहर तोटरे, खुशालराव पाटील उमरदरीकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, अरुण महाजन, राजन देशपांडे, निळकंठ चव्हाण, गणपत गायकवाड, जगदीश बियाणी, डॉ.अशोक कौरवार, बाबुराव वंजे जळकोटकर, मैनोद्दीन शेख, बाळासाहेब पुंडे,बालाजी चाफेकर, कैलास माधसवाड यांच्यासह सुप्रभात मित्र मंडळ, पत्रकारसंघ, वैद्यकीय संस्था, इमा, वकील संघटना, जिप्सी, संजीवनी सकाळ, जि.प. सदस्य, न.प. आजी-माजी सदस्य, मायबोलीचे मुखेड व कंधार सदस्य, अधिकारी, कार्यकर्ते, मुखेडसह जांब, बा-हाळी, उमरदरी परीसरातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रंथ विक्रीस मोठा प्रतिसाद मिळाला.