१ मार्च रोजी प्रा. हेमलता महिश्वर यांच्या हस्ते उद्घाटन; स्वागताध्यक्षपदी डॉ. पुष्पाताई थोरात तर निमंत्रकपदी वर्षा गरुड यांची निवड
नांदेड| अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलनास एक मार्चपासून प्रारंभ होत असून संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रुपाताई कुलकर्णी बोधी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन डॉ. हेमलता महिश्वर या करणार असून स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. पुष्पाताई थोरात या पार पाडणार आहेत. तीन मार्चपर्यंत चालणाऱ्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उद्घाटन, परिचर्चा, परिसंवाद, आंबेडकरी काव्यसंध्या, पथनाट्य, विधानचर्चा, आंबेडकरी काव्यजागर, आंबेडकरी जलसा आदी भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने कार्याध्यक्ष तथा येथील साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
'आशय' या संस्थेच्या वतीने एक मार्च ते तीन मार्च या कालावधीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकडी परिसरात तीन दिवसीय अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एक मार्च रोजी दुपारी चार वाजता आंबेडकरी बालसंस्कार वर्ग आणि समता सैनिक दलाच्या समता मार्चने संमेलनाचा आगाज होईल. २ मार्च रोजी सकाळी ११ वा. उद्घाटन होणार असून प्रा. पूनम दुशमाड (दिल्ली), तेंझिम डोल्मा( तिबेट ), अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे, आयआरएस डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. वृंदा साखरकर ( अमेरिका ), यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी २ वा. परिचर्चा आयोजित केली असून त्यात डॉ. वसंत शेंडे, प्रा. पूनम अभ्यंकर, संध्या राजूरकर, अस्मिता दारुंडे हे सहभागी होणार आहेत. दुपारी ४ वा. 'स्रियांच्या सर्वांगिण माणूसमयतेचे सर्वश्रेष्ठ शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर डॉ. लीलाताई भेले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात छाया कोरेगावकर, छायाताई खोब्रागडे, धम्मसंगिनी, नूतन माळवी, अपेक्षा दीवाण, प्रा. प्रदिप मेश्राम, डॉ. मनोहर नाईक, रविंद्र मुन्द्रे हे विचारवंत आपली भूमिका मांडणार आहेत. सायंकाळी ६ वा. ज्येष्ठ कवयित्री सुरेखा भगत यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी काव्यसंध्या हा कार्यक्रम होणार आहे तर रात्री पाचव्या सत्रात सांची जीवने यांचा नाट्यप्रयोग संपन्न होईल.
तिसऱ्या दिवशी सकाळी १० वा. डॉ. शोभा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली परिचर्चेस सुरुवात होईल. यात अवधेश कुमार नंद, डॉ. अशोक इंगळे, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. माधव सरकुंडे हे चिंतक सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वा. प्रा. प्रदिप लोहकरे लिखित 'गेम' हे पथनाट्य नांदगाव हिंगणघाट येथील सिद्धार्थ युवा कला मंच सादर करतील. पुढील सत्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ जून १९३६ रोजीच्या भाषणातील एका विधानावर विधानचर्चा संपन्न होईल. प्रा. अनिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सरिता सातारडे, प्रा. प्रविण कांबळे, रमेश कटके, प्रा. आत्माराम ढोक, प्रा. डॉ. भास्कर पाटील,
कुंदा सोनुले, सुषमा पाखरे, डॉ. प्रशांत धनविज, वेणूताई जोगदंड इत्यादी वक्ते या विधान चर्चेत सहभागी होतील. दुपारी चार वाजता 'आंबेडकरी काव्यजागर' होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. नंदा तायवाडे ह्या राहतील. शेवटच्या सत्रात अजय चेतन यांचा तुफानातील दिवे हा आंबेडकरी जलसा सादर होणार आहे. तत्पूर्वी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. रुपाताई बोधी, डॉ. मा.प. थोरात, प्रशांत वंजारे यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजिका सुमेधा खडसे, माया वासनिक, रक्षणा सरदार, सुनंदा बोदिले, प्रा. सीमा मेश्राम, संजय मोखडे यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.