नांदेड, अनिल मादसवार| मराठवाड्याच्या एका काठावर असूनही नांदेड जिल्ह्याला एक समृद्ध शैक्षणिक-साहित्यिक वारसा लाभलेला आहे. शिक्षणाचा यशस्वी नांदेड पॅटर्न म्हणूनही आम्ही या जिल्ह्याकडे पाहतो. या साऱ्या वैभवासह या जिल्ह्याला माजी केंद्रीय गृह मंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी एक समृद्ध आणि परिपक्व राजकीय संस्कृती दिली आहे. याचा वारसा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थपणे सांभाळून सर्वसामान्यांच्या विकास कामांचा नवामापदंड निर्माण केला आहे, या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गौरव केला.
मराठी भाषा संवर्धनासाठी आणि वाचन चळवळ अधिक रुजावी, वाढावी यादृष्टिकोणातून नांदेड येथे सर्वात चांगले मध्यवर्ती ग्रंथालय उभे राहील यासाठी सर्वतोपरी मदत करू असे त्यांनी जाहीर केले. शिक्षणाचे प्रवाह हे मातृभाषेतून विकसित होतात. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. कालच आपण साजऱ्या केलेल्या मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा होईल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. आता याची अधिक प्रतिक्षा न करता आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ साकारू असे त्यांनी जाहीर केले. नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मी मागच्यावेळेस भेट देऊन पाहणी केली होती.
येथील सर्व सुविधा, वास्तुरचना पाहून मलाही रत्नागिरीमध्ये असे महाविद्यालय का असू नये असे वाटले. मी त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले व आता तेथेही असे महाविद्यालय साकारले जात आहे. नांदेड मधील प्रत्येक पॅटर्न कोकणासाठीही आवश्यक असून जी विकास कामे पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये घेतली तशीच कामे आम्ही रत्नागीरीतही पूर्ण करीत असल्याचे त्यांनी निसंकोचपणे सांगितले. कोकणासाठीही सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी मदत केली आहे. तेथे समुद्र किनाऱ्यावर गावे अधिक आहेत. तेथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 275 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे असलेल्या सर्व सोई-सुविधायुक्त स्वतंत्र अभ्यासिकेच्या व इतर शैक्षणिक कामांचे भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे. विशेषत: आपले राजकीय ज्येष्ठत्व बाजुला सारून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मला व आमच्या सहकाऱ्यांना पुढे केले. या सर्व भूमिपूजन समारंभास उपस्थित राहणे हे मी माझ्या राजकीय जीवनातील एक महत्वपूर्ण योगायोग असल्याचे प्रतीक समजतो, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांची समयोचित भाषणे झाली.