गोरगरीबांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठीच नांदेड येथे शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

 नांदेड येथे नर्सिंग कॉलेजच्या शुभारंभासह इतर सहा प्रकल्पांचे भूमिपूजन-लोकार्पण

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा


नांदेड, अनिल मादसवार|
नांदेडच्या शिक्षण क्षेत्राला भक्कम पायावर उभे करण्याचा ध्यास घेण्या पाठीमागे स्व. शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टि आहे. त्याकाळी नांदेडची गरज ओळखून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शैक्षणिक संस्थाही सुरू करण्याबाबत विचार केला होता. तथापि यात इथल्या गोर-गरीब बहुजन वर्गातील मुलांना खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडणार नाही, त्यांना शिक्षणाच्या संधी मिळणार नाहीत हे लक्षात घेऊनच ज्या काही शैक्षणिक शासकीय संस्था येथे आणता येतील, उपलब्ध करून देता येतील त्यावर प्राधान्याने आम्ही भर दिला. यातूनच शिक्षणाच्यादृष्टिने नांदेड हे महत्वाचे केंद्र साकारू शकले, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

नांदेडच्या शैक्षणिक सेवा-सुविधांना अधिक भक्कम करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल, शासकीय अध्यापक महाविद्यालय इमारत, शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बीएससी नर्सींग कॉलेज शुभारंभ, प्रशासकीय व ग्रंथालय इमारतीच्या आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण कामांच्या शुभारंभ, धनगरवाडी येथील दोनशे क्षमतेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींची उपस्थिती होती. 

आज भूमिपूजन झालेल्या विविध शैक्षणिक प्रकल्पासाठी वर्षभरापासून नियोजन सुरू होते. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व प्रक्रिया तत्पर पूर्ण करून दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील विविध प्रकल्पांसाठी भरीव पाठिंबा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहिली पाहिजे. कालागणिक यात बदलही झाले पाहिजेत. जनतेच्या कल्याणासाठी याचे उत्तरदायित्व असते. हे लक्षात घेता आजवर कोणत्याही विकासाच्या कामात मी राजकारण आणले नाही, आणत नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून त्यांनी विकास प्रक्रियेच्या सर्व समावेशक योगदानाला अधोरेखीत केले. 

वाढत्या नांदेड महानगराच्या गरजांना लक्षात घेऊन येथील वैद्यकीय सेवा-सुविधाही भक्कम असल्या पाहिजेत यावर आमचा भर आहे. सर्वसामान्य लोकांना विविध आजारांवरील उपचार परवडले पाहिजेत.आजही कॅन्सरवरील उपचारासाठी, न्युरॉलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी सारख्या आजारांवर उपचाराच्या चांगल्या सुविधा आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्यकीय क्षेत्रात स्टाफ-नर्सेसची अत्यावश्यकता आपण कोरोनाच्या काळात अनुभवलेली आहे. 

या भागातील विद्यार्थी व विद्यार्थींनींना या क्षेत्रातले चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासकीय परिचारीका महाविद्यालयाची उपलब्धी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॉमा केअर सेंटर, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, फिजीओ थेरपी यासह रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. एका बाजुला शैक्षणिक सेवा-सुविधा भक्कम करीत असतांना त्यांची स्वच्छता आणि निगा ही तेवढीच महत्वाची आहे. यासाठी पर्यायी विचार करून जबाबदार संस्थांना ही कामे सोपविली पाहिजेत, असेही त्यांनी स्‍पष्ट केले. नांदेडच्या या वैभवासाठी व विविध शैक्षणिक संस्थांसाठी विष्णुपूरी येथील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान याची तुलना करता येणार नाही. आज त्यांच्या योगदानामुळेच हे सर्व प्रकल्प साकारू शकले, असे सांगून त्यांनी विष्णुपुरीच्या भूमिपूत्रांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी