नांदेड, अनिल मादसवार| मराठवाड्याचे भाग्यविधाते श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण व कै. सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गेली अनेक वर्षांपासून दरवर्षी नांदेडमध्ये संगीत शंकर दरबारचे आयोजन केले जाते. पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या धर्तीवर संगीतप्रेमींना गीत-संगीताची मेजवानी देणारा हा संगीत शंकर दरबार यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी आज येथे दिली.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संगीत शंकर दरबारचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत या महोत्सवात देशभरातील शास्त्रीय संगीत व सुगम संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी संगीत शंकर दरबारमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाइतकेच मराठवाड्यात संगीत शंकर दरबारला महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने जमावबंदीचे निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधामुळे नाईलाजास्तव संगीत शंकर दरबार रद्द करावा लागत आहे, असेही डी. पी. सावंत म्हणाले.