दुग्धोत्पादक शेतकर्‍यांच्या पशुंचे वंध्यत्व निवारण शिबिर -NNL

पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकिय विद्यापीठाचा पुढाकार


नांदे
ड,
आनंदा बोकारे| विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत दुध उत्पादक शेतकर्‍यांसाठी पशु संवर्धन विभाग तसेच पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त पुढाकारातुन पशु वंध्यत्व निवारण तसेच उपचार शिबिराचे नांदेड तालुक्यातील रहाटी (बु.) येथे आयोजित करण्यात आले.

मदर डेअरी, पशु संवर्धन विभाग तसेच पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 फेब्रुवारी मंगळवारी वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण 88 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला. त्यात 27 जनावरांची वंध्यत्व तपासणी व औषधोपचार करण्यात आले असून 230 जनावरांचे गोचिड निर्मुलन फवारणी, 80 जंतनाशक औषधे, 11 खच्चीकरण, 1 कृत्रिम रेतन, 25 गर्भ तपासणी व 26 इतर उपचार करण्यात आले. 

नांदेड जिल्ह्यात मदत डेअरी अंतर्गत अनेक अभिनव उपक्रम राबवले जात असून त्याद्वारे शेतकर्‍यांचा अर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत असल्याबाबतचे समाधान पशुपालकांनी व्यक्त केले. मदर डेअरीस दुध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना मोफत ठोंबे वाटप, 50% अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप, मुरघास, 25% अनुदानावर संतुलित पशुखाद्य वाटप इ. योजना राबवल्या जातात. याशिवाय फॅट व एस.एन. एफ. वाढीसाठी दुध संकलन केंद्रांतर्गत दुध उत्पादकांना कॅलशइम व खनिज मिश्रण मुबलक किमतीत दिले जाते. दुध उत्पादक शेतकर्‍यांना दर वर्षी दुध संकलनाच्या आधारावर बोनस ही दिला जातो. जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांना यावर्षी एकूण 25 लाख रुपये बोनस वाटप केला आहे.

सदर वंध्यत्व निवारण शिबिरात डॉ.वैभव चौतमाल, डॉ.शुभांगी, डॉ.आर. व्ही. सुरेवाड, सहा. आयुक्त, पशुसंवर्धन, डॉ. अविनाश बुन्नावार, पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती नांदेड, डॉ.यु.टी. गुट्टे, डॉ.अश्र्विनी खरवडकर, पी.यु.देशमुख, जी.डी. मठपती यांनी जनावरांवर औषधोपचार केले असून महेश सिरपवार, मारोती हिंगमिरे, सरपंच सौ.डॉ.दिपाली शेळके, उपसरपंच पुंडलिक बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे, ज्ञानोबा बोकारे व इतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी